अद्याप अर्ज न आल्याने विधानसभा विरोधी पक्षनेता निवडला नाही, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली भूमिका स्पष्ट

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर येथे सुरू होत आहे. मात्र विरोधी पक्षनेत्याची अद्याप निवड झालेली नाही. अर्जच न आल्याने विरोधी पक्षनेता निवडला गेलेला नाही अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मांडली. महाविकास आघाडीने मात्र तीनही पक्षाचे नेते चर्चा करून यावर निर्णय घेतील असे म्हटले आहे.

शिवसेना 20 आमदारांच्या संख्याबळावर महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे. कॉंग्रेसकडे 16 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 10 आमदार आहेत. संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेचा अधिकार आहे. परंतु विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे 10 टक्क्यांचे संख्याबळ एकाही पक्षाकडे सध्या नाही. अशा स्थितीत विरोधी पक्षनेता पदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांकडे जातो.

विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज आलेला नाही असे सांगून अध्यक्ष राहुल नार्वेकर आज त्यांनी अर्ज दाखल व्हावा असे संकेत दिले आहेत. यामुळे आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यासंदर्भात हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्यात चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत.

उपाध्यक्ष पदाचे काय?

विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याबरोबरच विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळावे असा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आधीच देण्यात आला आहे. मात्र विधानसभेचे उपाध्यक्षपद सत्ताधारी पक्षातील अजित पवार गटाला हवे आहे, तर विधान परिषदेचे सभापतीपद मिळावे यासाठी शिंदे गट आग्रही आहे. यामुळे विधानसभेचे उपाध्यक्षपद आणि विधान परिषदेचे सभापतीपद याचा तिढा कसा सोडविला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.