Pandharpur Wari 2024 : राहुल गांधी विठुरायाचा आशीर्वाद घेणार, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आल्याने महाराष्ट्रात आघाडीतील घटक पक्षांमध्ये उत्साह आणि चैतन्य आहे. त्यातच आता महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही कंबर कसल्याचे दिसत आहे. पंढरपूर वारी म्हणजे महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव असतो. आणि पंढरपूरची वारी पुढच्या दोन-तीन दिवसांत सुरू होत आहे. या वारीत आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात येत्या तीन-चार महिन्यांत म्हणजेच ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेसने तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. त्यातच संपूर्ण महाराष्ट्र भक्तीत दंग होतो अशी पंढरपूर वारी येत्या काही दिवसांत सुरू होत असल्याने काँग्रेसनेही त्या दृष्टीने विचार सुरू केला आहे. राहुल गांधी पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास काँग्रेसला ते फायदेशीर ठरू शकते.

पंढरपूर आषाढी सोहळा 17 जुलैला आहे. आणि त्यापूर्वी राहुल गांधी हे 13 किंवा 14 जुलैला पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतील. त्यापूर्वी ते पालखी सोहळ्यातही सहभागी होती. या काळात पालखी सोहळे हे माळशिरस तालुक्यात असतात. यावेळी माळशिरस ते वेळापूर या मार्गावर राहुल गांधी वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप राहुल गांधी यांच्या पंढरपूर दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही पंढरीच्या वारीत पायी सहभागी होणार आहेत. शरद पवार बारामती ते इंदापूरमधील सणसरपर्यंतचे 17 किमी अंतर वारीत पायी चालणार आहेत. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात 7 जुलैला बारामती ते सणसर हे अंतर शरद पवार चालणार आहेत.