EVM व निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढणार?

दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकी पार पडली. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि पक्षासमोरील इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाल्याचं समजते. तसेच ईव्हीएम व निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधी भारत जोडो यात्रा 3.0 काढणार असल्याचा निर्णय झाल्याचे समजते.

या व्यतिरिक्त काँग्रेसकडून देशभरातली बोगस मतदारांविरोधातही एक कॅम्पेन सुरू केले जाणार आहे. तसेच या बोगस मतदारांवर कडक कारवाई व्हावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्णय झाल्याचे समजते.

या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, संपर्क प्रभारी जयराम रमेश आणि काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. तर महाराष्ट्रातून या बैठकीत बाळासाहेब थोरात उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणामधील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा पक्ष आढावा घेण्यात आला. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकांबाबत ही या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस मुख्यालयात ही बैठक पार पडली.