अदानी हा मोदींचा देव असून ते जेव्हा आदेश देतात तेव्हा ईडी आणि सीबीआयला पाठवून काम करून घेतात, अशा शब्दात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार घणाघात केला. हरयाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी हरयाणा विजय संकल्प यात्रा सुरू केली आहे. आजच्या पहिल्या दिवशी यात्रा नारायणगड ते ठाणेसर अशी काढण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते.
आम्हाला असा भारत नको आहे, जिथे 25 लाख लोक चैन करतात, हजारो कोटींचे लग्न साजरे करतात आणि शेतकरी तसेच मजूर उपाशी मरतात. मोदी द्वेष पसरवत आहेत. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याबद्दल बोलतात. चक्रव्यूहाचा आकार कमळासारखा आहे, ज्यात अभिमन्यूला अडकवून मारण्यात आले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. अग्निवीर योजनेवरूनही राहुल गांधी यांनी मोदींना घेरले. अदानींची शस्त्र लष्कराला विकण्यासाठी अग्निवीर योजना आणली. ही योजना म्हणजे सैनिकांचे पेन्शन चोरण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी एनडीए सरकारवर निशाणा साधला.
अदानी सरकारची गरज नाही
हरयाणात अदानी सरकारची गरज नाही. शेतकरी आणि मजुरांचे सरकार स्थापन होईल. जेव्हा माझी गरज असेल तुम्हाला फक्त ऑर्डर द्यावी लागेल. राहुल इकडे या, मी तिकडे हजर होणार असे आश्वासनही राहुल गांधी यानी यावेळी दिले. हरयाणात सरकार बनले तर 36 समुदायांचे सरकार बनवले जाईल. सर्वांचे सरकार स्थापन होईल. सर्वांचा समान सहभाग असेल. हे छोटे पक्ष भाजपचे पक्ष आहेत. ही लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. लढा केवळ विचारसरणीचा आहे, असे राहुल गांधी म्हणले.
मोदी गरीबांच्या खिशातून वाऱयासारखा पैसा काढून घेऊन सुनामीप्रमाणे अदानींच्या तिजोरीत टाकत आहेत. परंतु, माझे लक्ष्य आहे की, जितका पैसा त्यांनी आपल्या मित्रांना दिला आहे. तितका पैसा मी हिंदुस्थानातील, गरीब, वंचित आणि शोषितांना देणार. – राहुल गांधी