गरिबांना आणि श्रीमंतांना वेगळा न्याय का? पुणे घटनेवरून राहुल गांधींचा सवाल

पुण्यात भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवून एका अल्पवयीन मुलाने दोन इंजिनियर तरुण-तरुणीला धडक दिली. त्यात त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही गाडी अतिशय महागडी आणि आलिशान गाडी म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, ती गाडी चालवणारा चालक हा अवघा 17 वर्षांचा होता. या अपघातानंतर जमावाने या मुलाला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं. हा मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याचा मुलगा आहे.

या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही एका व्हिडीओच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करत समान न्यायाची मागणी केली आहे. ते म्हणाले की, बस, ट्रक, ओला उबर किंवा रिक्षाचालक यांनी कुणाला धडक दिली तर त्यांना 10 वर्षांची शिक्षा होते आणि त्यांच्या वाहनाची चावी फेकून दिली जाते. पण, श्रीमंत घरातला 16-17 वर्षांचा मुलगा दारू पिऊन दोघांना उडवतो, तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितला जातो. हा निबंध कधी ट्रकचालक किंवा बसचालकांकडून का लिहून घेतला जात नाही. नरेंद्र मोदी यांना जेव्हा विचारण्यात आलं की देशात दोन हिंदुस्थान निर्माण झाले आहेत. एक गरिबांचा आणि दुसरा श्रीमंतांचा.. तेव्हा त्यांचं उत्तर आलं की मी सगळ्यांना गरीब बनवू का? पण हा मुळातच प्रश्न नाहीये. मूळ प्रश्न न्यायाचा आहे. श्रीमंतांना आणि गरिबांना दोघांनाही न्याय मिळायला हवा. तो एकसमान असायला हवा. त्यासाठीच आम्ही लढतोय, असं राहुल यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे.