NEET पेपरफुटीवर पंतप्रधान मोदी गप्प का? राहुल गांधी यांचा थेट सवाल

NEET परीक्षेतील गैरप्रकारावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी NEET परीक्षेतील गैरप्रकारांवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी या मुद्द्यावर गप्प आहेत आणि भाजप शासित राज्ये ही पेपरफुटीची एपिसेंटर बनली आहेत, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

NEET परीक्षेत 24 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे आणि नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे गप्प आहेत. बिहार, गुजरात आणि हरयाणामध्ये अटकेची कारवाई होत आहे. अतिशय योजनाबद्ध आणि संघटितपणे भ्रष्टाचार झाला आहे आणि भाजप शासित राज्ये ही पेपरफुटीची एपिसेंटर बनली आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणी ट्विट केले आहे.

‘रस्त्यावर उतरून संसदेपर्यंत आवाज उठवू’

लोकसभा निवडणुकीच्या आमच्या न्यायपत्रात पेपरफुटी प्रकरणी कठोर कायदा करून तरुणांचे भवितव्य सुरक्षित करण्याची गॅरंटी देण्यात आली होती. आता विरोधी पक्षाची भूमिका आम्ही पार पाडू. रस्त्यावर उतरून देशातील तरुणांचा आवाज संसदेपर्यंत उठवू. सरकारवर दबाव आणून कठोर धोरण आणण्यासाठी भाग पाडू, असे राहुल गांधी म्हणाले.

नीट परीक्षेती आयोजनात कुठल्याही प्रकारे 0.001 टक्के जरी निष्काळजीपणा झाला तरी त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी प्रचंड मेहनत घेत असतात. त्यामुळे कल्पना करा गैरप्रकार करणारा एखादा व्यक्ती डॉक्टर झाला तर, तो समाजासाठी किती घातक ठरू शकतो, असे निरीक्षण मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान सुप्री कोर्टाने नमुद केले. तसेच या सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी NTA ला 8 जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.