लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रथमच मुलाखत दिली. या मुलाखतीत राहुल गांधी यांनी एक मोठा दावा केला आहे. तसेच एक जरी गडबड झाली तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कोसळू शकते, अशी स्थिती असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत न मिळाल्याने एनडीएमधील मित्रपक्षांच्या टेकूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार उभे आहे. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे. मोदींचा प्रतीमा नष्ट झाली आहे. मोदी विचारधाराही संपली आहे. भाजपचा मूळ पाया आणि धार्मिक द्वेष पसरवण्याची त्यांची विचारधारा डळमळीत झाली आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.
नरेंद्र मोदी यांच्यासमोर सरकार टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. या निवडणुकीतील अनपेक्षित निकालाने हिंदुस्थानच्या राजकारणात एक मोठा बदल झाला आहे. आणि पंतप्रधान मोदींना आपले सरकार टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
‘मोदींच्या गटात असंतोष’
निवडणुकीचे निकाल पाहता स्थिती नाजूक बनली आहे. छोटीशी गडबड झाली तरी सरकार कोसळू शकते. सरकारमधील एका मित्रपक्षाने जरी भूमिका बदलली तरी सरकार पडेल. मोदींच्या गटात प्रचंड असंतोष आहे. त्यातील अनेकजण आपल्या संपर्कात आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. पण ते कोण आहेत? याची माहिती राहुल गांधी यांनी उघड केली नाही. फायनॅन्शियल टाइम्स दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी हा दावा केला आहे.
द्वेष पसरवायचा, भावना भडकवायच्या आणि त्यातून आपला राजकीय हेतू साध्य करायचा, अशी त्यांची विचारधारा आहे. मात्र, हिंदुस्थानच्या नागरिकांनी ही विचारधारा फेटाळली. यामुळे यावेळी सत्ताधारी आघाडीला सरकार टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. कारण 2014 आणि 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या जे कामी आले ते यावेळी कामी आले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ‘इंडिया’ आघाडी एकजुटीने निवडणूक लढली आणि जनतेने आम्हाला साथ दिली, असे राहुल गांधी म्हणाले.