स्पेनचा महान टेनिसपटू राफाएल नदालने पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया कतार ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. पूर्णतः तंदुरुस्त नसल्याने आपण या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा नदालने सोशल मीडियावर केला. तो म्हणाला, दोहामध्ये खेळायला मला आवडते. येथे मला आयोजक आणि चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळालेलं आहे, मात्र दुर्दैवाने मी अद्यापि अनफिट असल्याने या स्पर्धेत खेळू शकत नाही. 37 वर्षीय राफाएल नदालला 3 मार्चला कार्लोस अल्कराजविरुद्ध एका प्रदर्शनीय सामन्यात खेळायचे आहे. त्यानंतर तो पॅलिपहर्नियातील इंडियन वेल्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. नदालने एका वर्षाच्या ब्रेकनंतर जानेवारीत टेनिस कोर्टवर पुनरागमन केले होते. त्याने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन सामने खेळले होते, मात्र नदालने दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घेतली. तेव्हापासून तो टेनिसपासून लांब आहे.