कोटा हिंदी भाषिक अल्पसंख्याकचा; प्रवेशाच्या यादीत भलतेच विद्यार्थी, दालमिया कॉलेजची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार

मालाड येथील प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकॉनॉमिक्सने अकरावीच्या अल्पसंख्याक कोटय़ातील प्रवेशाची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे तक्रार केली आहे. या कॉलेजमध्ये हिंदी भाषिक अल्पसंख्याक कोटा असून शिक्षण विभागाकडून मिळालेल्या प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांच्या यादीत हिंदी वगळता अन्य अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे कॉलेजचे म्हणणे आहे. या विद्यार्थ्यांना हिंदी भाषिक अल्पसंख्याक कोटय़ातून प्रवेश देण्यास कॉलेजने स्पष्ट नकार दिला आहे.

अकरावीच्या कोटय़ातील प्रवेशात प्रचंड गोंधळाविरोधात दालमिया कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिगंबर गंजेवार यांनी शिक्षणमंत्र्यांकडे लेखी तक्रार करून अल्पसंख्याक कोटय़ातून केवळ हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.

दालमिया कॉलेजमध्ये अकरावी अनुदानितच्या एकूण 1080 जागांपैकी 540 जागा या अल्पसंख्याक कोटय़ातील आहेत. यंदा केवळ दोनच विद्यार्थ्यांचे अनुदानित जागेवर प्रवेश झाले आहेत.

तर विनाअनुदानित जागेवरही दोन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून विनाअनुदानितच्या एकूण 120 जागांपैकी 60 जागा या अल्पसंख्याक कोटय़ातील आहेत.