दोन भावांना सक्तमजुरीची शिक्षा, कोरानाकाळात शासकीय कामात अडथळा

कोरोनाकाळात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अमोल बाबासाहेब पवार (वय 36) आणि राहुल बाबासाहेब पवार (वय 32, दोघेही रा. लक्ष्मीवाडी, मिरज) या दोन भावांना तीन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी सुनावली.

अमोल व राहुल पवार यांना साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, कलम 2-ब , कलम 3(2)(1) तसेच कलम 353 अन्वये दोषी धरण्यात आले. साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, कलम 2-ब चा भंग करून सदर कायद्याखाली कलम 3(2)(1) अन्वये प्रत्येकी रक्कम 50 हजार रुपये दंड आणि कलम 353 अन्वये प्रत्येकी 1 हजार रुपये, अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

कोरोनाकाळात आनंद बाबूराव संकपाळ हे कॉन्स्टेबल लक्ष्मीवाडी येथे तपासणीनाक्यावर शासकीय काम बजावत होते. 18 जुलै 2020 रोजी रात्री अमोल पवार हे विनाकारण तपासणी नाक्याजवळ थांबले होते. त्यावेळी फिर्यादी संकपाळ यांनी अमोलला सांगितले की, ‘सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून, संचारबंदी आहे. त्यामुळे तू इथून जा.’ त्यावेळी अमोलने संकपाळ यांच्याशी वाद घालत दमदाटी व धमकी दिली. तसेच त्याचा भाऊ राहुल याला घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर राहुल तिथे आला व दोघा भावांनी संकपाळ यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व शासकीय कामात अडथळा आणला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती. ज्योती एस. डाके यांनी काम पाहिले.