पुणे शहरातील विविध भागात अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. कल्याणीनगरमध्ये भरधाव मोटार चालकाने दोघा अभियंत्यांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात आलिशान मर्सिडीज बेंज गाडीने दुचाकीस्वाराला चिरडले. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुण्यात नक्की सुरू तरी काय आहे? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
केदार मोहन चव्हाण (वय 41, रा. पद्मावती) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी मर्सिडीजचा चालक नंदू अर्जुन ढवळेला ताब्यात घेतले आहे. केदार चव्हाण हे कुरिअर कंपनीत कामाला होते. ते स्वारगेट परिसरातील पार्सल घेऊन विमानतळ परिसरात जात होते. येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात पाठीमागून भरधाव मर्सिडीज बेंज कारने चव्हाण यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेनंतर केदार हे बाईकवरून पडले व बेंझ चालकाने गाडी त्यांच्या अंगावर घातली.
मे महिन्यात पुण्यातील कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत त्याच्या पोर्शे कारने एका बाईकला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बाईकवरील तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतरही पुण्यात बरेच हिट अँड रनची प्रकरणं समोर आली आहेत.