Video – बारामतीत प्रशिक्षणार्थी विमानाचा पुन्हा अपघात, थोडक्यात बचावला पायलट आणि ट्रेनर

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये पुन्हा एकदा प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात झाला. रविवारी सकाळी गोजुबावी गावाजवळ हा अपघात झाला असून यात दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त विमान रेड बर्ड अकादमीचे (Red Bird Academy) असल्याची माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोजुबावी गावाजवळ रविवारी सकाळी सातच्या सुमारास जुना सह्याद्री काऊ फार्मजवळील लोखंडे वस्तीनजिक तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाने आपातकालिन लँडिंग केले. यावेळी विमानाचा अपघात झाला.

व्हीटी आरबीटी टेक्नम (Tecnam aircraft VT-RBT) या जातीचे दोन सीटर विमान होते. या अपघातामध्ये पायलटसह ट्रेनर किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात नक्की कोणत्या कारणामुळे झाला याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती डीजीसीएने दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही रेड बर्ड अकादमीचे (Red Bird Academy) प्रशिक्षणार्थी विमान बारामतीजवळ कोसळले होते. बारामती तालुक्यातील कटफळ येथे हे विमान कोसळले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वारंवार प्रशिक्षणार्थी विमानांच्या अपघातामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.