Pune News – छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला…, स्वप्निल कुसाळेने पुन्हा सर्वांचं मन जिंकलं

महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकाला आपला जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला याचा अभिमान असतो. मात्र हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच शिवरायांच्या विचारांवर पाऊल ठेऊन आपल्या नावाचा डंका जगभरात वाजवतात. या मोजक्या लोकांमध्ये स्वप्निल कुसाळेचे नाव अभिमानाने घ्यावं लागेल. स्वप्नीलने Paris Olympics 2024 मध्ये नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात हिंदुस्थानला कांस्यपदक जिंकून दिले. स्वप्निलने महाराष्ट्रामध्ये येताच पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमला भेट दिली. यावेळी त्याची ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना आपला जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाल्याचा अभिमान वाटतो, असे सांगायला तो विसरला नाही.

कोल्हापूरच्या पठ्ठ्याने Paris Olympics 2024 मध्ये नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात हिंदुस्थानचा कांस्यपदक जिंकून दिले. तब्बल 72 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये स्वप्निल कुसाळेच्या स्वरूपात महाराष्ट्राचा डंका वाजला. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पहिलेवहिले पदक जिंकले होते. खाशाबा जाधव यांच्यानंतर स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्राकडून पदक जिंकणारा दुसरा महाराष्ट्रवीर ठरला आहे. पदक जिंकून महाराष्ट्रात आल्यानंतर स्वप्नीलने पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमला भेट दिली. यावेळी मोठ्या संख्येन चाहत्यांनी एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात त्याचे स्वागत केले. यावेळी वृत्तसंस्था ANI शी बोलताना स्वप्नील कुसाळेने आपल्या भावना व्यक्त केल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला. त्यामुळे मला त्याचा खूप अभिमान आहे. खूप वर्षांनी मला देशासाठी आणि राज्यासाठी एवढ्या मोठ्या व्यासपीठावर पदक जिंकण्याची संधी मिळाली.” असं म्हणत स्वप्नीलने आपल्या विजयात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श असल्याचे अभिमानाने सांगितले.