Pune News – बिबट्याचा तरुणावर हल्ला, 300 मीटर अंतरापर्यंत केला पाठलाग; नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण

आंबेगाव तालुक्यातील कळंब-लौकी मार्गावरुन प्रवास करत असताना एका 24 वर्षीय दुचाकी चालकावर बिबट्याने हल्ल्ला केल्याची घटना घडली आहे. प्रसंघावधान राखत तरुणाने दुचाकी न थांबवता वेगात पुढे नेल्यामुळे तरुणाचा जीव वाचला आहे. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. बिबट्याने हल्ला केल्याची ही दहावी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.

गणेश विलास ढवळे हा 24 वर्षीय तरुण आंबेगाव तालुक्यातील कळंब ते राणूबाई मंदिरमार्गे पाचघरवस्ती-लौकी येथे जात होतो. गणेश हा दुचाकीवरुन आणि त्याचे मामा ज्ञानेश्वर सोनाजी थोरात हे चारचाकी गाडीतून पाचघरवस्तीकडे जात होते. यावेळी जातेखाव वस्तीजवळ असलेल्या द्राक्ष बागेजवळ शेताच्या बांधावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने ढवळे यांच्यावर हल्ला केला. तब्बल 250 ते 300 मीटर अंतरापर्यंत बीबट्याने त्यांचा पाठलाग केला. प्रसंगावधान राखत तरुणाने दुचाकी न थांबवता वेगात पुढे नेल्यामुळे त्याचे प्राण वाचले. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात त्याच्या डाव्या हाताला, डाव्या पायाला आणि पाठीला बिबट्याने पंजा मारल्यामुळे जखमा झाल्या आहेत.

मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ढवळे यांना दाखल केले आहे. ढवळे यांच्या डाव्या हाताला, डाव्या पायाला आणि पाठीला बिबट्याचा पंजा लागल्याने जखमा झाल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच एकता अनिल थोरात आणि उपसरपंच मंगल विनोद थोरात यांनी केली आहे. “कळंब लौकी या रस्त्यावर गेल्या वर्षभरात बिबट्याच्या हल्ल्याच्या नऊ ते दहा घटना घडल्या असून या ठिकाणी वारंवार पिंजरा लावूनही बिबट्या जेरबंद होत नाही. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. ज्या ठिकाणी बिबट्याचा हल्ला होतो, त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला लाईट नाही. त्यामुले त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी, तसेच रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे झुडपे काढून टाकावी,” अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.