मुळा धरणातून 15 हजार क्युसेक विसर्ग सुरू

मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या 15 हजार क्युसेक विसर्गामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीपात्रातील पाणी पाहण्यासाठी जुन्या पुलाजवळ रविवारी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मुळा धरणाचे 11 गेट 15 इंच उंचावून शनिवारी रात्री 9 वाजता 10 हजार क्युसेक, तर रात्री 11 वाजता 15 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. शनिवारी रात्री 9 ते रविवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुळा धरणातून नदीपात्रात 1134 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाला आहे. यापूर्वी 12 ते 14 ऑगस्ट या तीन दिवसांत 468 दशलक्ष घनफूट पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पाहता समन्वयी पाणीवाटप धोरणानुसार यंदा मुळा धरणातून जायकवाडीला सोडावे लागणारे पाण्याचे गंडांतर टळण्यास मदत होणार आहे. मघा नक्षत्रातील समाधानकारक पावसामुळे मुळा धरण तांत्रिकदृष्टय़ा भरले असून, धरणाची पाणीपातळी समान ठेवण्यासाठी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने मुळा उजवा कालव्यातून सुरू असलेले पाणी आवर्तन शनिवारी बंद होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, उजव्या कालव्यातून 300 क्युसेकने शेतीच्या पाण्याचे आवर्तन रविवारीदेखील सुरूच राहिले.

शनिवारी रात्री 11 वाजता मुळा धरणातून 15 हजार क्युसेक नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. रविवारी सकाळी 6 वाजता कोतुळकडून मुळा धरणात 7 हजार क्युसेक, 9 वाजता 10 हजार 26 क्युसेक, दुपारी 12 वाजता 10 हजार 342 क्युसेक, 3 वाजता 9 हजार 541 क्युसेक, सायंकाळी 6 वाजता 8 हजार 373 क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. रविवारी सायंकाळी 6 वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा 24 हजार 840 दशलक्ष घनफूट, तर पाण्याची पातळी 1810 फुटांपर्यंत जाऊन पोहचली.