पुण्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक कोटींची अवैध दारू पकडली, पुणे एक्साईजची कारवाई

नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा राज्यनिर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या दारू तस्करीचा पर्दाफाश करीत तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत एकूण एक हजार 668 मद्याच्या बॉटल्स जप्त केल्या. तर, 9 आरोपींना अटक केली. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपअधीक्षक सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शहर परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. विविध 21 ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आली आहेत. केवळ गोवा राज्यात विकल्या जाणाऱ्या दारूची महाराष्ट्रात चोरी छुप्या पद्धतीने तस्करी होत असते. कर चुकवून आयात होणाऱ्या या मद्यावर उत्पादन शुल्कची नजर ठेवण्यात येत होती. या दरम्यान एका प्रवासी लक्झरी बसमधून मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारू पुण्यात आणली असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार निगडीतील खासगी बस टर्मिनलवर या दारूचा साठा जप्त करण्यात आला. तर, बसचा ड्रायव्हर आणि क्लिनर यांना अटक केली. सदरचा मद्यसाठा खडकी या ठिकाणी वितरीत होणार असल्याने त्या ठिकाणी जाऊन मद्यासह एकून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासह साथीदाराकडून तब्बल 68 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर, नसरापूर येथे केलेल्या कारवाईत 51 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये ही दारू छुप्या पद्धतीने ठेवण्यात आली होती. येथून चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ११६ दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले.

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैधरीत्या होणारी दारू तस्करी रोखण्याच्या सूचना पथकांना दिल्या होत्या. त्यानुसार शहरातील नसरापुर आणि निगडी परिसरात वेगवेगळ्या दोन पथकाकडून ही कारवाई करीत सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील दोन दिवस आणखी सतर्कता बाळगून कारवाई केली जाणार आहे. – चरणसिंह रजपूत, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पुणे.