बिल्डरपुत्र वेदांत अग्रवालला कमी शिक्षा का? सुनील प्रभू यांचा सवाल

बसचालक, ट्रकचालक, रिक्षाचालक कुणाच्या मृत्यूस जबाबदार ठरले तर त्यांना दहा वर्षांची शिक्षा दिली जाते. मग पुण्यात मद्यपान करून भरधाव गाडी चालवत वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतल्यानंतरही त्याला कमी शिक्षा का, असा जाब विधानसभेत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सरकारला विचारला. तसेच अशा घटना रोखण्यासाठी काय निर्बंध घालणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पुणे हिट अॅण्ड रन प्रकरणावरून सुनील प्रभू यांनी विधानसभेत आज लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर झालेल्या चर्चेत भाग घेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारची चिरफाड केली. धनदांडग्याचा मुलगा असल्याने वेदांत अग्रवालला दोघांचे जीव घेऊनही पोलिसांनी निबंध लिहिण्याची आणि वाहतूक पोलिसांबरोबर पंधरा दिवस काम करण्याची शिक्षा दिली. तो पोलिसांच्या ताब्यात होता तेव्हा येरवडा पोलिसांनी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. वेदांत अग्रवालला पोलीस ठाण्यात पिझ्झा, बर्गर देऊन व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली गेली? त्याला कमी शिक्षा का दिली गेली, असा सवाल सुनील प्रभू यांनी केला. या लक्षवेधीवर झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे भास्कर जाधव, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, अमीन पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांनी भाग घेतला.

या लक्षवेधीला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. 110 किलोमीटर वेगाने वेदांत अग्रवाल त्यावेळी गाडी चालवत होता. तत्पूर्वी त्याने ज्या बारमध्ये मद्यपान केले त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहेत. अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला दिल्याबद्दल वेदांतचे वडील विशाल अग्रवाल आणि ड्रायव्हरला गुन्हा अंगावर घेण्यासाठी घरात कोंडून ठेवणाऱया त्याच्या आजोबांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. पोलिसांनी वेदांतला तीन वाजता पोलीस ठाण्यात आणले, पण त्याला तपासणीसाठी आठ वाजता पाठवले ही पोलिसांची चूक झाली. तसेच योग्य गुन्हा नोंदवला नाही. याप्रकरणी संबंधित पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे, असे त्यांनी सभागृहाला सांगितले.

पब आणि बारवर ‘एआय’ पॅमेऱयांची नजर
पुण्यातील या घटनेनंतर गृह विभाग अॅक्शन मोडवर आला असून 70 अनधिकृत पबवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पुण्यासह राज्यातील पब आणि बारमध्ये नियमांचे पालन होत आहे का, हे तपासण्यासाठी ‘एआय’ पॅमेऱयांची मदत घेतली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

राजकीय दबाव नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेनंतर काही राजकीय नेत्यांनी पह्न करून पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप केला, मात्र तसा कोणताही दबाव असता तर आरोपीवर कडक कारवाई झाली नसती, असे फडणवीस म्हणाले. ड्रग्जवाल्यांचीही गय केली जाणार नाही, असे ते म्हणाले.