पुण्यासह राज्यातील विविध भागात घरफोडी, वाहनचोरी, दरोड्याचे गुन्हे करणार्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा यूनिट सहाच्या पथकाने अटक केली. आरोपीवर विविध प्रकारचे 100 हून अधिक गुन्हे दाखल असून सध्या तो वॉन्टेड होता. वानवडी भागातून आरोपीला अटक करण्यात आली.
पापासिंग दयालसिंग दुधाणी (वय 50, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखा यूनिट सहाचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान घरफोडीतील सराईत गुन्हेगार दुधाणी हा वानवडीमधील बी. टी. कवडे रोड परिसरात थांबला असल्याची माहिती अंमलदार नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून दुधाणीला ताब्यात घेतले. दुधाणी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुण्यासह पिंपरी, सांगली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वाहनचोरी, घरफोडी, दरोडा असे 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आरोपीवर यापूर्वी मोक्का कारवाई करण्यात आली होती. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.