पर्यटनाच्या बहाण्याने घरमालकाचे अपहरण; विमानाने झारखंडला नेऊन गंगा नदीपात्रातील एका बेटावर डांबले

भाडेकरूने साथीदारांसोबत पर्यटनाच्या बहाण्याने घरमालकाचेच अपहरण केले. अपहृत घरमालकाला थेट विमानाने झारखंड येथे नेऊन गंगा नदीपात्रातील एका बेटावर डांबून ठेवले आणि मुलाला फोन करून एक कोटीची खंडणी मागितली. पिंपरी-चिंचवड पोलीस आणि झारखंड पोलिसांनी घरमालकाची सुखरूप सुटका केली.

यशवंत विनोदे (वय 55, रा. विनोदे वस्ती, वाकड) असे सुखरूप सुटका झालेल्या अपहृत व्यक्तीचे नाव आहे. नसीम मनीरुल हक अख्तर (वय 20, रा. पश्चिम बंगाल) लल्लू रुस्तम शेख (वय 45, रा. झारखंड), साजीम करिम बबलू शेख (वय 20, रा. पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचे तीन साथीदार गंगा नदीत उडी मारून पसार झाले. साजीम याला कल्याण येथून जेरबंद केले. ओमकार विनोदे (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. ओमकार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तर, वडील यशवंत यांच्या नावाने चाळ असून, अनेक खोल्या भाड्याने आहेत. आरोपींपैकी एकजण नारळविक्रेता असून, विनोदे यांच्या खोलीत भाडेकरू म्हणून राहतो. वडिलांच्या मोबाईलवरून एकाने कॉल करून 1 कोटी रुपये खंडणीची मागणी केली. तसेच, पैसे न दिल्यास तसेच पोलिसांकडे गेल्यास वडिलांना जीवे मारू, अशी धमकी दिली, असे ओमकार विनोदे यांनी खंडणीविरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक यांना कळविले. खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, युनिट चारचे संदिप सावंत आणि गुंडाविरोधी पथक यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.

पोलीस आयुक्तांनी साधला झारखंड पोलिसांशी संपर्क
ओमकार यांना आरोपी त्यांच्या वडिलांच्या फोनवरून ‘१ कोटी लवकर जमा कर, पोलिसांकडे गेल्यास अगर काही गडबड केल्यास तुझ्या वडिलांना ठार मारू,’ अशी धमकी देऊन रात्री दहापर्यंत पैसे जमा कर. त्यानंतर कोठे यायचे ते सांगतो, असे सांगून फोन बंद करत होते. त्यानंतर पुन्हा सायंकाळी साडेसात वाजता आरोपींनी फोन करून, ‘पैसे किती जमा झाले? अर्धा तासात पुणे रेल्वे स्टेशन येथे घेऊन ये’, असे कळवून फोन बंद केला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मालदा आणि झारखंडमधील पोलीस अधीक्षक, साहिबगंज यांच्याशी संपर्क साधला. गुन्हे शाखा आणि झारखंड पोलिसांच्या पथकाने रात्री आरोपींचा पालचगाची प्राणपूर, बनुटोला आणि गोल ढाब खोन्यात बोटीतून आणि चिखलातून पायी प्रवास करून माग काढला. गोलढाब बेटावर यशवंत यांची सुखरुप सुटका केली.

ही कारवाई खंडणीविरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, युनिट-४ चे पोलीस निरीक्षक संदीप सावंत, फौजदार सुनील भदाणे, रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार सुनील कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, मंगेश जाधव, आशीष बोटके, भुपेंद्र चौधरी, गुंडाविरोधी पथकाचे फौजदार अशोक जगताप, रामदास मोहिते, युनिट ४चे प्रशांत सैद, सुखदेव गावांडे, अमर राणे, नागेश माळी व पोपट हुलगे यांचे पथकाने केली.

थेट विमानाने झारखंड
तपास करित असताना अपहरण झालेल्या यशवंत यांना पर्यटनाच्या बहाण्याने त्यांचा भाडेकरू असणारा नारळ पाणीविक्रेता विमानाने कोलकाता येथे घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले. पुणे विमानतळावरील कोलकात्याला जाणाऱ्या विमानातील प्रवाशांची माहिती घेऊन, सीसीटीव्ही कॅमेरे तपासून संशयित व्यक्तींची माहिती प्राप्त करण्यात आली. फौजदार सुनील भदाणे, अशोक जगताप, प्रदीप गोडांबे, मंगेश जाधव व रामदास मोहिते यांना शोध
घेण्याकरिता झारखंड व पश्चिम बंगाल राज्यांत रवाना करण्यात आले.

Tenant abducts landlord on pretext of tourism with accomplices