पुण्यात घरफोड्यांचा उच्छाद, चालू वर्षात तब्बल 309 गुन्हे

>> गणेश राख

पुणे शहर परिसरात घरफोड्या करणाऱ्या चोरटयांनी उच्छाद मांडला असून दिवसाढवळ्या फ्लॅट, घरामध्ये घुसून महागडा ऐवज लांबविला जात आहे. जानेवारी ते अद्यापपर्यंत (दि.14) शहरात घरफोडीचे तब्बल 309 गुन्हे दाखल झाले आहेत. यातुलनेत गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. अनेक गुन्ह्यात लाखोंचा ऐवज चोरी गेल्यानंतर पोलिसांना आरोपींचा थांगपत्ता लागत नाही. तपास पथकांना आलेली मरगळ हे त्याचे प्रमुख कारण आहे.

शहरात घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण मोठे असून दिवसाढवळ्या घरे फोडली जात आहेत. अनेक सराईत गुन्हेगार दिवसा परिसरात रेकी करून रात्री घरफोडीचा डाव साधतात. गेल्या काही दिवसात असे अनेक गुन्हे घडले आहेत. याशिवाय पाच दहा मिनिटांसाठी घराला कडी लाऊन बाहेर गेल्याचा मोका साधत आरोपी हात साप करून घेतात. घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यातील काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश येत असले तरी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. अनेक आरोपी पोलिसांना सापडत नाहित. अनेक दिवस आरोपी सापडला नाही तर पोलिसांचा तपास देखील थंडावतो. मात्र, यानंतर तोच आरोपी आणखी मोठा गुन्हा करतो. नुकतेच शहरात असा प्रकार समोर आला. यानंतर पोलीस आयुक्तांनी त्याची चांगलीच दखल घेतली. मात्र, यामुळे स्थानिक पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. विशेषतः स्थानिक पोलिस ठाण्यातील तपास पथकांच्या माध्यमातून आवश्यक असा तपास होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे परिसरात दिवसाढवळ्या गुन्हे करण्यापर्यंत आरोपींची मजल वाढत चालली आहे.

…तपास पथकांना मरगळ

सद्यस्थितीत स्थानिक पोलीस ठाण्यातील तपास पथकाला (डीबी) मरगळ आल्याचे चित्र आहे. पोलीस ठाणे हद्दीतील परिसर, गुन्हेगारांची माहिती आणि उत्तम नेटवर्क अशी असलेली तपास पथकाची ओळख पुसत चालली आहे. अनेकदा दिवसाढवळ्या गजबजलेल्या परिसरात गुन्हा घडल्यानंतर देखील तपास पथकाला आरोपींचा थांगपत्ता लागत नाही. हद्दीची व गुन्हेगारांची इत्यंभूत माहिती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या पथकामध्ये घेणे अपेक्षित असते. मात्र, अलिकडच्या काळात अधिकाऱ्यांच्या मागे-पुढे करणाऱ्यांची या पथकामध्ये जास्त प्रमाणात भरती असल्याचे दिसून येते. याचा परिणाम डीबी पथकांच्या कामगिरीवर जाणवू लागला आहे.

…घरफोडीचे घडलेले गुन्हे

परिमंडळ गुन्ह्यांची संख्या
झोन एक. 23
झोन दोन. 44
झोन तीन. 54
झोन चार 82
झोन पाच. 106