पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार; आरोपी पसार, शोधासाठी 10 पथके

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱया पुण्यात महिलांबरोबरच चिमुरडय़ाही सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गुरुवारी वानवडीत स्कूल व्हॅनचालकाने दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर त्याच रात्री बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. शहरात एकापाठोपाठ एक घडत असलेल्या या सुन्न करणाऱ्या घटनांनी राज्यातील मिंधे सरकार आणि पोलीस यंत्रणा कायदा-सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्येच्या माहेरघराला नराधमांची लागलेली ही साडेसती संपणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बोपदेव घाटात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीसोबत हा प्रकार घडला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीची तक्रार घेण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी परराज्यातील आहे. तिचा मित्र जळगावमधील आहे. दोघे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तरुणी इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेते, तर तरुण सीए करीत आहे. गुरुवारी (दि. 3) रात्री अकराच्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात फिरायला गेले होते. रात्री अकराच्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून तिघेजण तेथे आले. त्यांनी दोघांना धमकावले. त्यानंतर तरुणाला मारहाण करून त्याच्या शर्टनेच त्याचे हात बांधले, नंतर तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिघेही पसार झाले. घाबरलेल्या तरुण-तरुणीने तेथून आपली सुटका करून घेतली. मध्यरात्री एकच्या सुमारास ते परिसरातील एका रुग्णालयात गेले. पण, त्या रुग्णालयाने त्यांना ससून रुग्णालयात पाठविले. ससून रुग्णालयात गेल्यानंतर तपासणी करून रुग्णालयाने  याबाबतची माहिती (एमएलसी) कोंढवा पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी दहा पथके तयार केली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

z रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे

पुणे हे क्राईम कॅपिटल झाले आहे. प्रचंड प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना पुण्यात दररोज घडत आहेत. त्याकडे राज्यातील महायुती सरकारचे दुर्लक्ष होत असून, त्याला सर्वस्वी राज्याचे गृह खाते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही. सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हेदेखील तेवढेच जबाबदार आहेत. – सुप्रिया सुळे, खासदार

खराडीतील शाळेत चिमुरडीवर अत्याचार

शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढतच असून खराडी भागातील एका शाळेत इयत्ता तिसरीतील मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी भागातील एका शाळेत पीडित मुलगी तिसरीत आहे. 1 ऑक्टोबर रोजी मुलीची आई तिला गुड टच आणि बॅड टचबाबत माहिती देत होती. त्यावेळी मुलीने शाळेतील एका व्यक्तीने स्वच्छतागृहाच्या बाहेर वाईट पद्धतीने स्पर्श केल्याचे आईला सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.