‘वाटचाल सहा दशकांची’ पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. अलिमियाँ परकार यांनी लिहिलेल्या वाटचाल सहा दशकांची या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक केवळ आत्मकथन नसून आत्मविश्लेषण आहे. पुस्तकात वैद्यकीय क्षेत्रातील शांत, संयमित, ध्येयवादी आणि सामाजिक बांधीलकी मानणाऱया एका मनस्वी लेखकाच्या जीवन वाटचालीचा आदर्श राजपथ आहे, असे प्रकाशनावेळी बोलताना डॉ. सुपे म्हणाले.

वैष्णो व्हिजन आणि ग्रंथाली प्रकाशनने डॉ. अलिमियाँ परकार यांच्या वाटचाल सहा दशकांची या आत्मकथन पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. राधाबाई शेटय़े सभागृहात प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची प्रस्तावना वैष्णो व्हिजनच्या संस्थापक संचालिका पद्मा भाटकर यांनी केली. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. रमेश चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, डॉ. शाश्वत शेरे, लेखक-अनुवादक प्रकाश कामत, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, संपादक अरुण जोशी, धनश्री धारप, डॉ. मतिन परकार, डॉ. ओमर परकार, निर्माता-दिग्दर्शक जयू भाटकर उपस्थित होते. आपल्या मनोगतात डॉ. अलिमियाँ परकार यांनी हे माझे आत्मचरित्र नाही, हे अनुभवचरित्र असल्याचे डॉ. परकार यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीरंग कद्रेकर म्हणाले की, डॉ. अलिमियाँ परकार यांचे लेखन हे सर्वसामान्य वाचकाला रूचेल, पचेल असे आहे. आपण जसे जगलो ते पारदर्शकपणे मांडले आहे.