महिला अत्याचाराच्या विरोधात जनता आक्रमक; चंद्रापुरात मशाल मोर्चा

देशात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या विरोधात जनता आक्रमक झाली असून चंद्रपुरात मशाल मोर्चा काढण्यात आला. विविध सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्षांच्या चंद्रपूर जागृती मंच या बॅनरखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला. शनिवारी रात्री नऊ वाजता हा मोर्चा गांधी चौकातून काढण्यात आला.

या मोर्चात खासदार प्रतिभा धानोरकर, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, सामाजिक कार्यकर्त्या अभिलाशा गावतुरे, अश्विनी खोब्रागडे, आशिष माशिरकर यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले. महाविद्यालयीन युवक – युवती, तृतीयपंथी मोर्चात हातात मशाल घेत घोषणा देत होते. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड, वरोरा, बल्लारपूर आदी ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना या आठ दिवसांत घडल्या. राज्यात बदलापूरची घटना घडली. या घटनांमुळे समाजमन पेटून उठल्याचे या मोर्चाने दाखवून दिले. हा मोर्चा रात्री 11 वाजता प्रियदर्शिनी चौकात आला. त्यावेळी उपस्थितांना महिला सन्मान आणि रक्षणाची शपथ देण्यात आली. ज्वलंत विषयावर समाजाने एकत्रित येवून काढलेल्या या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले.