विनाअनुदानित शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन

राज्यातील अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान लागू करण्यात यावे या मागणीसाठी शिक्षकांनी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी भरपावसातही आंदोलक शिक्षक आझाद मैदानात ठाण मांडून होते. जोपर्यंत शिंदे-पवार-फडणवीस सरकार राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, आम्हाला आता आश्वासन नको ठोस कृती हवी आहे, असा आक्रमक पवित्रा विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी घेतला आहे. राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.