Ratnagiri News : रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून शिवसैनिकांचे आंदोलन

रत्नागिरी शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांचे वाहन चालवताना कंबरडे मोडले आहे. शहरातील खड्ड्यांवरुन नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालवताना जीवाशी खेळ सुरू आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रत्नागिरी शहरातील रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन केले.

रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. रस्त्यावरील हे खड्डे दररोज अपघाताला निमंत्रण देत आहेत. खड्ड्यांबाबत नागरिकांमधील प्रचंड संतापानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रत्नागिरी शहरातील रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन छेडण्यात आले.

रत्नागिरी नगरपरिषद जांभा दगड वापरून खड्डे भरत आहे. मात्र पावसामुळे जांभा दगडाने भरलेले खड्डे अधिक मोठे होत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे सिमेंट कॉंक्रिटने भरावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली.

यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, संजय साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, माजी नगरसेवक सलील डाफळे, नितीन तळेकर, बावा चव्हाण, महिला शहर संघटक मनिषा बामणे, माजी नगरसेविका रशिदा गोदड, संध्या कोसुंबकर, साजिद पावसकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.