कोल्हापुरात अंशतः अनुदानित शिक्षकांचा आक्रोश मोर्चा, अनुदान नाही तर मतदान नाही; शासनाने शिक्षकांना हलक्यात घेऊ नये

पावसाची तमा न बाळगता अंशतः अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षकांनी बुधवारी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढला. राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याचा अध्यादेश काढण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे कृती समितीने मागणी केली. यावेळी शिक्षकांनी ‘अनुदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘अनुदान नाही तर मतदान नाही’, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

दोन किलोमीटर व्हिनस कॉर्नरमार्गे चालत हजारो शिक्षकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. माजी खासदार निवेदिता माने, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पाटील, बी. जी. बोराडे यांनी मोर्चात सहभागी होऊन आंदोलनस्थळी भेट देत शिक्षकांना पाठिंबा दिला. यावेळी झालेल्या समांतर सभेत तसेच जिल्हाधिकाऱयांसमोर झालेल्या चर्चेत आमदार आसगावकर, भगवानराव साळुंखे, खंडेराव जगदाळे यांनी संघटनेच्या मागण्या आणि शासनाची भूमिका यावर सविस्तर चर्चा केली. मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी स्वीकारले.

राज्यातील अंशतः अनुदानित शाळांसाठी वाढीव टप्प्याचे अनुदान देण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनीही वारंवार तसेच सांगितले होते. मात्र, याचा अध्यादेश अद्यापही निघाला नसल्याने राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने अंशतः अनुदानित 1250 हून अधिक शिक्षकांनी कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसांपासून धरणे, मुंडण, भजन, थाळीनाद आंदोलन सुरू केले आहे. तसेच अंबाबाई मंदिरापर्यंत दंडवत घालून सरकारला अध्यादेश काढण्याची सुबुद्धी देण्यासाठी साकडेही घातले होते.

अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

जर आमच्या न्याय्य मागण्यांचा विचार शासनाने केला नाही तर, तसेच वाढीव टप्पा अनुदानाचा शासननिर्णय तत्काळ काढला नाही, तर पालकमंत्र्यांच्या दारात बसून आंदोलन करण्यात येणार आहे.

आज अंशतः अनुदानित सर्व शाळा बंद

या आंदोलनातील एक भाग म्हणून आज बुधवारी कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा महामोर्चा काढला. तसेच जिह्यासह सांगली, सातारा जिह्यांतील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद होत्या. तिन्ही जिह्यांतील शिक्षक मोर्चाच्या ठिकाणी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यामध्ये उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, सुभाष खामकर, शशिकांत खडके, डी. एस. घुगरे, शरद पाडळकर, अनिल ल्हायकर, बी. जी. बोराडे, दादा लाड, राहुल पोवार, भरत रसाळे, प्रेमकुमार बिंदगे, संदीप काळे, सुनील शेंडे, अरविंद पाटील, प्रमोद पाटील, बी. जी. पाटील, यशराज गाडे, राजू भोरे, केदारी मगदूम, भाग्यश्री राणे, जयश्री पाटील, नेहा भुसारी यांच्यासह कृती समितीच्या हजारो शिक्षकांनी सहभाग नोंदवला. उद्या (दि. 8) ढोल-ताशा आंदोलन शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे होणार आहे.