राज्यभरातील रेशन दुकानदारांचे गुरुवारी आंदोलन

राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदार आपल्या मागण्यांसाठी येत्या गुरुवारी राज्यभरात एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहेत.या एकदिवसीय आंदोलनात शिरूर तालुक्यातील रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनाही सामील होणार आहे‌.यासंबंधीचे निवेदन संघटनेच्या वतीने शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना मंगळवारी देण्यात आल्याची माहिती रेशन दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष ‌गणेश रत्नपारखी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यभरातील तहसील कार्यालयांसमोर राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार एकदिवसीय धरणे, आंदोलन, निदर्शने, साखळी उपोषण करणार आहेत.तसेच तहसीलदार यांच्यामार्फत राज्य शासनाला आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. यासाठी शिरूर तालुक्यातील रास्त भाव दुकानदार व किरकोळ विक्री परवानाधारक संघटना या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे रत्नपारखी यांनी सांगितले. यावेळी शिरूर तालुका रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेचे अध्यक्ष ‌ गणेश रत्नपारखी,‌ संघटनेचे सल्लागार व मार्गदर्शक भरत कालेवार, ‌खजिनदार नवनाथ खैरे उपस्थित होते.

राज्यातील रेशन दुकानदारांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी अनेक मागण्या यापूर्वी शासनाकडे केल्या आहेत, परंतु बहुतांश मागण्या या अजूनही पूर्ण झालेल्या नसून त्या मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात.त्यासाठी शासनाला स्मरण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
गणेश रत्नपारखी – अध्यक्ष,शिरुर तालुका रेशन दुकानदार संघटना