देवगिरी किल्ल्यावरील भारतमातेच्या पूजेस मनाई; मोदी सरकारच्या पुरातत्व खात्याची मोगलाई

मराठी दौलतीचा झेंडा ज्या देवगिरीवर फडकला, संगीत रत्नाकरासारख्या गानरसपूर्ण ग्रंथाचा जन्म जिथे झाला, शांतिब्रह्म एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या देवगिरीच्या किल्ल्यावर पुरातत्त्व खात्याच्या रूपाने औरंगजेबच अवतरला आहे! औरंगजेबाने दख्खनमध्ये ‘बुतपरस्ती’ म्हणजेच पूजाअर्चेला मनाई केली होती. आता पुरातत्त्व खात्यानेही देवगिरीच्या किल्ल्यावर असलेल्या भारतमाता मंदिरासह इतर मंदिरांमध्ये पूजाअर्चा करता येणार नाही, असे फर्मान सोडले आहे.

संपूर्ण जगभरात देवगिरीचा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. जगाच्या कानाकोपऱयातून मराठी रियासतीचा हा वारसा पाहण्यासाठी पर्यटक येतात. शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दन स्वामी यांचे या किल्ल्यावर वास्तव्य होते आणि त्यांची समाधीही येथेच आहे. त्याचबरोबर नानासाहेब पेशव्यांनी किल्ल्यावर संकट विनायकाचे मंदिर बांधले. या दोन्ही ठिकाणची पूजाअर्चा नानासाहेब पेशव्यांनी लावून दिली. हैदराबाद संस्थान 1948 मध्ये हिंदुस्थानात विलीन झाले. त्यावेळी सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून देवगिरीच्या किल्ल्यात भारतमातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. समाधीस्थळ आणि संकट विनायक मंदिराच्या पूजाअर्चेची जबाबदारी पोखारे गुरुजींकडे असून कांजुणे कुटुंब मंदिराची देखभाल करते. 4 जूनला पुरातत्त्व खात्याने एक फर्मान काढून राजेंद्र काशिनाथ कांजुने यांना मंदिरात पूजाअर्चा तसेच साफसफाई करण्यास मनाई केली.

– किल्ल्यावरील मंदिरांमध्ये स्वातंत्र्यपूर्व नव्हे तर अनेक शतकांपासून पूजाअर्चा होत आहे. मग हा किल्ला ‘नॉन लिव्हिंग मोन्यूमेंट’ कसा असू शकतो? पुरातत्त्व खाते, सांस्कृतिक मंत्रालय दिंडी आणि गणेश पूजेवरही निर्बंध लादणार आहे का? हिंदूंच्या मंदिरांत पूजाअर्चेला परवानगी नाकारण्यात येणार असेल तर हाच निकष औरंगजेबाच्या कबरीलाही लावणार का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

भारतमाता मंदिर परिसरात अस्वच्छता होत असल्याची तक्रार काही पर्यटकांनी केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. देवगिरी किल्ला हा नॉन लिव्हिंग मोन्युमेंट प्रकारात मोडतो. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची पूजाअर्चा करणे प्रतिबंधित आहे. पुरातत्त्व संरक्षण कायदा, संरक्षित स्मारक अधिनियम 1958 आणि 1959 चे हे उल्लंघन आहे. त्यामुळे या मंदिरातही पूजा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मंदिरांच्या साफसफाईची जबाबदारी पुरातत्त्व खात्याची असून, त्यासाठी आमचे कर्मचारी आहेत.
– डॉ. शिवकुमार भगत, अधीक्षक,
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग

अस्वच्छतेचे कारण सांगून परंपरा खंडित करू नका
देवगिरीचा किल्ला पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात येण्याच्या आधीपासून श्री संकट विनायक मंदिर, जनार्दन स्वामी समाधी स्थळ आणि भारतमाता मंदिरांत पूजाअर्चा सुरू आहे. या ठिकाणी अस्वच्छता करणाऱयांना पुरातत्त्व विभागाने योग्य समज द्यावी. नियमानुसार दंड करावा. परंतु ही मंदिरे बंद करून परंपरा खंडित करू नयेत. स्थानिक गावकरी हे किल्ल्याचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी समन्वय साधून किल्ला जपला गेला पाहिजे.
– संकेत कुलकर्णी, सदस्य, गड संवर्धन समिती

अतिक्रमणाच्या विळख्यातून किल्ला बाहेर काढा
किल्ला पुरातत्त्व खात्याकडे येण्यापूर्वी भारतमातेचे मंदिर झाले. वाराणसी येथील प्रसिद्ध शृंगारगौरी मंदिरात स्वातंत्र्यापूर्वी हिंदू धर्मानुसार पूजाअर्चा करण्यात येत होती. न्यायालयाने हाच निकष मान्य करून तेथे पूजा करण्यास परवानगी दिली. पुरातत्त्व खात्याने थोडा सारासार विचार करून असे फर्मान काढायला हवेत. देवगिरी किल्ल्याभोवती होत असलेल्या अतिक्रमणांकडे मात्र पुरातत्त्व खाते डोळे झाकून बसले आहे.
– अॅड. स्वप्निल जोशी, इतिहासाचे अभ्यासक

– देवगिरीचा किल्ला हा निर्मनुष्य अर्थात नॉन लिव्हिंग या प्रकारात मोडतो. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची पूजाअर्चा करता येणार नाही, असे पुरातत्त्व खात्याने म्हटले आहे. असे केल्यास संरक्षित स्मारक अधिनियम 1958 आणि 1958 चे उल्लंघन ठरेल, असा इशाराही दिला आहे. हाच आदेश किल्ल्याच्या परिसरातील इतर मंदिरांना म्हणजेच रासाई देवी, संकट विनायक तसेच जनार्दन स्वामी मंदिरांनाही लागू असेल, असेही या आदेशात म्हटले आहे.