भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास दलित, मागासवर्गीय आणि धार्मिक अल्पसंख्याक समाजाचे प्रचंड नुकसान होणार आहे. भाजपचे सरकार घटनाविरोधी आहे. त्यामुळे प्रागतिक रिपब्लिकन आघाडीने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रमुख सन्मवयक श्यामदादा गायकवाड यांनी आज दिली.
महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शिवालय येथे आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते सुभाष देसाई, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, सुनील खोब्रागडे, केशव वाघमारे, निवृत्त पोलीस अधिकार संजय अपरांती उपस्थित होते.
आम्ही उमेदवार उभे केले नाहीत, पण दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या मूलभूत प्रश्नावर आम्ही पाठिंबा दिला आहे. आमच्या मूलभूत प्रश्नावर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी आमच्या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे, असेही श्यामदादा गायकवाड यांनी सांगितले.
या वेळी बोलताना शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले की, प्रागतिक रिपब्लिकन आघाडीने राज्यात जातीनिहाय जनगणना करावी, आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा 75 टक्क्यांवर न्यावी यासाठी दबाव वाढवण्याची मागणी केली आहे. अशा मागण्यांशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. महाविकास आघाडीचा वचननामा काही दिवसांत प्रसिद्ध होईल. त्यामध्ये शिष्यवृत्त्या, झोपडपट्टीची दुरवस्था या सर्वांकडे लक्ष दिले जाणार आहे. महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी आमची चर्चा झाली आहे. जागा वाटपात या गटांना सामावून घेता आले नाही तरी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व सामाजिक संघटना, रिपब्लिकन गटांना मानसन्मानाची वागणूक मिळेल. अनेक संधी येतील त्याद्वारे आपल्याला देशाची सेवा करता येईल, असा विश्वास या वेळी सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. वर्षा गायकवाड यांनीही प्रागतिक रिपब्लिकन आघाडीचे स्वागत केले आणि महाराष्ट्रात सत्ताबदल होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात दलित आदिवासी यांच्या शिक्षणासाठी या सरकारने कात्री लावली आहे. अजित पवार अर्थ मंत्री झाले की दलितांचा निधी वळवला जातो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. या वेळी माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर यांचेही भाषण झाले.