राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘वाळवी’चा गौरव झालाच नाही, दिग्दर्शक परेश मोकाशी यांना मज्जाव; ‘झी’ मराठीवर आरोप

सत्तराव्या राष्टीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या ‘वाळवी’ चित्रपटाचा एकही प्रतिनिधी हा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या पुरस्कारसाठी उपस्थित राहावे यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या वतीने त्यांची पत्नी ‘वाळवी’च्या निर्मात्या व लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी झी टॉकीज मराठीच्या व्यवस्थापनाला तब्बल तीस ईमेल पाठविले; मात्र या व्यवस्थापनाने कसलाही प्रतिसाद न दिल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात ‘वाळवी’ या चित्रपटाच्या नावाचा साधा उल्लेखदेखील झाला नाही. मराठी अस्मितेला ‘वाळवी’ लावण्याच्या झीच्या भूमिकेबद्दल चित्रपटप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते कालच 70व्या राष्टीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण राजधानीतील विज्ञान भवनात झाले. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर ‘ममर्स् ऑफ जंगल’, ‘वारसा’ या मराठी चित्रपटांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले. हे सर्व पुरस्कार 2022 चे आहेत. मात्र, यात सर्वात अग्रभागी असलेल्या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या ‘वाळवी’च्या नावाचा साधा उल्लेखही नव्हता.

‘वाळवी’ला राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार 8 ऑक्टोबरला मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर चित्रपटाच्या लेखिका व निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी यांनी झीच्या समन्यवयकांशी वारंवार संपर्क साधला. सुरुवातीला चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून परेश मोकाशी कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे मोघम उत्तर व्यवस्थापनाकडून आले; मात्र पुरस्कार वितरणाची तारीख जवळ येऊ लागताच, व्यवस्थापनाकडून थातूरमातूर उत्तरे देण्यात येऊ लागली, असे मधुगंधा कुलकणी यांनी ‘सामना’शी बोलताना सांगितले.

हिंदी प्रोजेक्टच्या मीटिंगचे दिले कारण

राष्टीय पुरस्कार हा सन्मानाचा विषय आहे. सरकारचाही सन्मान राखला गेला पाहिजे. पाहिजे तर मी स्वखर्चाने दिल्लीला जाईन, असाही ईमेल आपण झी व्यवस्थापनाला पाठविला. मात्र, त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. आमचे प्रतिनिधी झीतर्फे हजर राहतील, असे कळविले गेले; मात्र त्यासंदर्भात आठवण करून दिली असता, ‘आज हमारी हिंदी के प्रोजेक्ट के बारे में मीटिंग है’, असे उद्दाम उत्तर झी व्यवस्थापनाने दिल्याचे मधुगंधा यांनी सांगितले.