सीईटी परीक्षेतील गोंधळाची चौकशी करा, घोटाळाप्रकरणी आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी; आदित्य ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेतील गोंधळ आणि गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच या परीक्षेत 54 चुका आढळल्या असून याप्रकरणी सीईटी सेलच्या आयुक्तांना निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या व्यथा आणि तक्रारी मांडण्यासाठी आज राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सीईटी सेलकडून निकालामध्ये घातलेला गोंधळ राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिला.

आदित्य ठाकरे यांनी सीईटी सेलद्वारे घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण या परीक्षांच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारी राज्यपाल रमेश बैस यांच्यासमोर मांडल्या. सीईटीच्या निकालात बऱ्यात त्रुटी असून विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गुण व श्रेणीत तफावत आहे. समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे पर्सेंटाईल दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आन्सर कीनुसार पाहिल्यास काहींना कमी गुण देण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर हेदेखील उपस्थित होते.

सीईटी परीक्षा वेगवेगळय़ा बॅचद्वारे घेतली जाते. त्याची एकच गुणवत्ता यादी जाहीर होते. प्रत्येक बॅचसाठी प्रश्नपत्रिका मात्र वेगळी असते. ही बाब अत्यंत आक्षेपार्ह असून यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होणार असल्याने यावर राज्यपालांनी तोडगा काढावा, अशी मागणीही राज्यपालांकडे करण्यात आली.

तोवर प्रवेश प्रक्रियेला स्थगिती द्या

सीईटी परीक्षेत एकूण 54 चुका आढळल्या आहेत. शेकडो विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी विविध तक्रारीदेखील केल्या आहेत. या तक्रारींचे निरसन होऊन विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण जाहीर करून या प्रक्रियेत पारदर्शकता आणून त्यानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली.

आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केलेल्या मागण्या

सीईटीचा निकाल पर्सेंटाईलमध्ये न देता विषयनिहाय मिळालेले गुण जाहीर करावेत.

एकूण गुणांनुसार गुणवत्ता यादी जाहीर करून टॉपर्स विद्यार्थ्यांची नावे घोषित करावीत.

विद्यार्थ्याने मागणी केल्यास त्यास उत्तरपत्रिका उपलब्ध करून द्यावी.

सीईटी परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मदत कक्ष सुरू करावा.

सीईटीतील 54 चुकांसाठी पेपर सेट करणाऱ्यांना जबाबदार धरावे.

ज्या विद्यार्थ्यांनी 1425 आक्षेप घेतले आहेत त्यांनी भरलेल्या प्रत्येकी एक हजार रुपये शुल्काचा परतावा द्यावा.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात.

विद्यापीठ परीक्षांची गुणपत्रिका लवकरात लवकर मिळावी.