खलिस्तानी अमृतपाल सिंहला पॅरोल मंजूर; 5 जुलैला घेणार खासदारकीची शपथ

खलिस्तानी समर्थक आणि वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याला चार दिवसांचा पॅरोल मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे अमृतपाल सिंह 5 जुलै रोजी खासदार म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती अपक्ष खासदार सरबजीत सिंह यांनी दिली.

बुधवारी सकाळी विधानसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर सरबजीत यांनी याबाबत खुलासा केला. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आसामच्या दिब्रुगढ तुरूंगात असलेल्या अमृतपालने 11 जून रोजी पंजाब सरकारला पत्र लिहून शपथविधी करीता पॅरोलच्या मंजुरीकरीता अर्ज लिहिला होता.

नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून वारीस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंह सुमारे 1.97 लाख मतांनी विजयी झाला. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत आसाममधील दिब्रुगढ तुरूंगात असताना अमृतपालने लोकसभा निवडणूकीकरीता अर्ज दाखल करण्याच्या परवानगीसाठी सात दिवसांसाठी सोडण्यात यावे अशी मागणी पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात केली होती.