‘समृद्ध’ करणारी भूमिका – प्रियदर्शिनी इंदलकर

‘शांतीत क्रांती’च्या पहिल्या सिझनच्या यशानंतर आता ‘शांतीत क्रांती’चा दुसरा सिझन 13 ऑक्टोबरला सोनी लिव्हवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. यानिमित्ताने तिच्याशी साधलेला संवाद.

‘शांतीत क्रांती सिझन-2’बद्दल आम्हाला काय सांगशील…
– सिझन-2 हास्याचा दुहेरी डोस घेऊन येणार आहे. 18 महिन्यांनंतर तिन्ही मित्र भेटल्यावर श्रेयस (अभय महाजन) त्यांना तो लग्न करणार असल्याची आनंदाची बातमी देतो आणि तिन्ही मुले श्रेयसच्या इंटरनॅशनल बॅचलर ट्रिपवर जाण्याचे ठरवतात. तिथे काय घडत हे ‘शांतीत क्रांती-2’मध्ये जरूर पाहा.
तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील…
– मला समृद्धीच्या भूमिकेबाबत सांगण्यात आले तेव्हा मी त्वरीत कनेक्ट झाले. आमच्या दोघींमध्ये खूप साम्य आहे. माझ्या व्यक्तिरेखेबद्दलची सर्वांत छान गोष्ट म्हणजे तिला त्रास देणारी एक गोष्ट मलाही माझ्या खऱया आयुष्यात अत्यंत त्रासदायक वाटते. ती गोष्ट म्हणजे आजूबाजूला पसरलेला कचरा. माझ्याप्रमाणेच समृद्धीलाही असा कचरा अजिबात आवडत नाही. ती कायम तिच्या पर्समध्ये कचरा गोळा करण्यासाठी एक पिशवी बाळगते. पर्यावरणाचे संवर्धन महत्त्वाचे आहे, असे आम्हा दोघींना वाटते.
शूटिंगचा अनुभव कसा होता…
– अप्रतिम ठिकाणांवरील सेट्सवर मी यापूर्वी कधीच काम केले नव्हते. यावेळचा अनुभव खूप खास होता. प्रत्येक स्थळाने माझ्यावर संपूर्ण गारुड केले. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला माझ्या
हॉटेलमधील रूमवर जावेसेच वाटायचे नाही. मला तेथेच थांबून त्या सुंदर स्थळांवरील निसर्गसौंदर्यात राहण्याची इच्छा व्हायची. त्या स्थळांमुळे मला कविता करण्याचीही प्रेरणा दिली. मी देहराडूनच्या प्रेमात पडले आहे.