Prithvi Shaw News : BCCI चा पृथ्वी शॉ ला दणका; रणजी संघातून वगळले, वाचा सविस्तर…

मुंबईचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉने अवघ्या कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पण हे यश तो फार काळ टिकवू शकला नाही आणि लवकरच त्याने हिंदुस्थानी संघातून आपले स्थान गमावले. मात्र आता देशांतर्गत क्रिकेटमधूनही पृथ्वी शॉ चा पत्ता कट होताना दिसत आहे.

मीडिया वृत्तानुसार, संजय पाटील (अध्यक्ष), रवी ठाकरे, जितेंद्र ठाकरे, किरण पोवार आणि विक्रांत येलिगेट्टी यांचा समावेश असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने शॉला किमान एका रणजी सामन्यासाठी वगळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शॉ ला वगळण्यामागचे नेमके कारण सांगितलेले नाही, मात्र तमाम रिपोर्ट्मध्ये जाहीर केलेल्या माहितीनुसार, फिटनेस आणि त्याच्या वर्तणुकीबाबत प्रशिक्षक नाराज असल्याचे बोलले जात आहे.

क्रिकबजच्या वृत्तानुसार, शॉची वर्तणुक मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी डोकेदुखी झाली आहे. शॉला वगळून निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाला त्याला धडा शिकवायचा आहे. पृथ्वीचे सरावाला उशिरा येणे ही संघ व्यवस्थापनासाठी मोठी चिंतेची बाब आहे. शिवाय, असे सांगण्यात आले की तो सराव सत्र गांभीर्याने घेत नाही आणि त्याच्या वजनाबद्दलही चिंता वाढत आहे.

पृथ्वी शॉला संघातून वगळण्याचा निर्णय केवळ निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचा नव्हता, तर प्रशिक्षक आणि कर्णधारालाही त्याला संघातून वगळण्याची इच्छा होती, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. पृथ्वी शॉने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 5 कसोटी, 6 वनडे आणि 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 58 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 339 धावा केल्या आहेत. याशिवाय शॉने एकदिवसीय सामन्यात 189 धावा केल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याच्या नावावर एकही धाव नोंदलेली नाही.