देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवान्या कशासाठी? मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात बॅनरबाजी

पुण्यातील टिळक स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी उद्या पुण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यापूर्वी युवक काँग्रेसकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. अलका चौक, संभाजी महाराज पुतळा, बालगंधर्व चौक आणि शनिवारवाडा भागामध्ये विरोधाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवान्या कशासाठी असा खडा सवाल युवर काँग्रेसने उपस्थित केला आहे. तसेच ‘मन की बात करो, मणिपूर की बात करो’, ‘मि. प्राईम मिनिस्टर गो टू मणिपूर, फेस द पार्लमेंट” असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. तसेच महिलांना सुरक्षा द्या, युवकांना रोजगार द्या, शेतकऱ्यांना हमीभाव द्या मग लोकमान्य पुरस्कार घ्या, असेही बॅनरवर लिहिण्यात आले आहे.