निवडणुकीआधी केंद्राच्या योजनांची महापालिकेच्या वॉर्डात जाहिरातबाजी; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ

मुंबई महानगरपालिकेचा कारभार गेल्या दीड वर्षापासून प्रशासकाच्या माध्यमातून चालत असताना लोकप्रतिनिधी आणि मुंबईकरांना निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच आता पालिकेच्या वॉर्डांमध्ये केंद्रांच्या योजनांची जाहिरातबाजी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 24 वॉर्डमधील सर्व 227 प्रभागांमध्ये विशेष वाहनांच्या माध्यमातून केंद्राच्या योजनांची माहिती पोहोचवली जाणार आहे. यासाठी ‘विकसित भारत’ संकल्प यात्रेदरम्यान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत चार विभागांत यात्रेची सुरुवात करण्यात आली. मात्र हा उपक्रम म्हणजे निवडणुकीआधी पेंद्राच्या योजनांची मुंबईत जाणीवपूर्वक जाहिरातबाजी करण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

केंद्र सरकारने देशाच्या विकासासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू केली आहे. तळागाळातील नागरिकांपर्यंत विविध योजना पोहचाव्यात, त्या योजनांचा नागरिकांना लाभ व्हावा हा यात्रा सुरू करण्यामागील हेतू आहे. या यात्रेच्या माध्यमातून देशातील नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंब या चार अमृत स्तंभांचा विकास करणे हाच केंद्र सरकारचा संकल्प असल्याचे सांगितले जात आहे. या संकल्पापासून सुरू झालेली ही यात्रा वरील चारही स्तंभांना समृद्धी आणि सिद्धी मिळवून देईल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना काढले. यावेळी ‘डी’, ‘एम पश्चिम’, ‘आर उत्तर’ आणि ‘एच पूर्व’ विभागांत यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी ’विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील विविध ठिकाणी नागरिकांशी दृश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.

महाराष्ट्रात 26 जानेवारीपर्यंत उपक्रम
15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे महाराष्ट्रात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचादेखील समावेश आहे. आज ‘डी’ विभाग कार्यालय, ‘एम पश्चिम’ विभाग कार्यालय, ‘आर उत्तर’ विभागात वैशाली नगर, दहिसर येथे आणि ‘एच पूर्व’ विभागात वांद्रे पूर्व परिसरातील चेतना महाविद्यालयाच्या मैदानावर नागरिकांना ‘विकसित भारत संकल्प यात्रा’द्वारे पेंद्र शासन पुरस्कृत योजनांची माहिती देण्यात आली.