इलेक्ट्रिक वाहनांसह वैद्यकीय, सोलर उपकरणांत चांदीचा वापर वाढला

इलेक्ट्रिक वाहने, वैद्यकीय उपकरणे व सोलर उपकरणांमध्ये चांदीचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात मागणीच्या तुलनेत चांदीचा कमी पुरवठा होत आहे. त्यामुळे चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या चांदीची प्रतिकिलो किंमत 90 ते 95 हजारांच्या आसपास असून, चांदीच्या औद्योगिक वापराने दराचा आतापर्यंतचा हा उच्चांक गाठला आहे.

सलग पाच वर्षे मागणी तसा पुरवठा होत नसल्याने पुढील वर्षी चांदीचा प्रतिकिलो दर सव्वा लाख रुपयांहून अधिक होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

चांदी हा एक चांगला विद्युतवाहक घटक असल्याने इलेक्ट्रिक वाहने, सोलर व वैद्यकीय उपकरणांमध्ये गेल्या काही वर्षांपासून चांदीचा वापरही जास्त प्रमाणात वाढत आहे. तसेच गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत खाणींमध्ये चांदीच्या उपलब्धतेत मोठय़ा प्रमाणात घट झाल्याने उत्पादन कमी झाले आहे. परिणामी खाणींतील खर्चही वाढला गेला आहे. बाजारपेठेत चांदीची उपलब्धता जर अशीच राहिली तर पुढील वर्षापर्यंत चांदीची प्रतिकिलो किंमत सव्वा लाखांहून अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चांदीचा औद्योगिक वापर वाढत असल्याने 2023 मध्ये चांदीची मागणी 11 टक्क्यांनी वाढून ती 20353 टन झाली आहे. केवळ यावर्षीचा विचार केल्यास बाजारपेठेतील मागणीच्या 7513 टन चांदीचा तुटवडा पडला असल्याने चांदीचा दर सध्या लाखाच्या घरात आहे. याबरोबरच इस्रायल-हमास आणि रशिया-युक्रेन युद्धासारखा तणाव पाहाता जगभरातील केंद्रीय बँका सोने-चांदीची खरेदी वाढवण्याचीही शक्यता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीची मागणी तसा पुरवठा होत नसल्याने दरावर परिणाम होत आहे.

– संजय माने, संचालक कोल्हापूर जिल्हा सराफ असोसिएशन