मुंबईतल्या झाडांची राष्ट्रपतींना भुरळ, ‘समुद्रफळ’ झाडांची माहिती मागवली

दक्षिण मुंबईत सागरी किनाऱ्यालगतच्या रस्त्यांवर एका रांगेत लावलेल्या झाडांची भुरळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पडली आहे. ही झाडे नेमकी कोणती आहेत, याची माहिती कोविंद यांनी पालिकेकडून मागवली आहे.

मुंबईच्या दक्षिण भागात वरळी येथील समुद्र किनाऱ्यापासून ही झाडं दिसू लागतात. राष्ट्रपती कोविंद हे चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असताना या भागातील ही झाडं त्यांच्या नजरेला पडली. पसरट मोठ्या पानांची रचना, लालसर फुलं आणि हिरव्या रंगाची फळं अशी रचना असलेल्या या झाडांनी त्यांना भुरळ घातली.

ही झाडं नेमकी कोणती आहेत, याबाबत त्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या बगिचा विभागातून माहिती मागवली आहे. बगिच्या विभागानेही ही माहिती राष्ट्रपतींच्या कार्यालयात पाठवू दिली आहे. राष्ट्रपतींना भुरळ टाकणाऱ्या या झाडाला सामान्य भाषेत समुद्रफळ असं म्हणतात. Barringtonia asiatica असं या झाडाचं शास्त्रीय नाव आहे. आफ्रिेका ते हिंदुस्थानपासून आग्नेय आशियापर्यंत ही झाडं आढळतात.

या झाडांना प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्यानजीक लावण्यात येतं. 10 ते 15 मीटर इतकी उंची, छोट्या फांद्या, सागाप्रमाणे मोठी पसरट आकाराची आणि चमकदार हिरव्या रंगाची पानं अशी याची रचना असते. या झाडाला वर्षभर बहर येतो. गुलाबी दांड्यांची पांढऱ्या ट्युलिपसारखी दिसणारी फुलं या झाडाला येतात. रात्रीच्या वेळी ती फुलं पूर्ण फुलतात आणि एखाद्या पावडर लावण्याच्या पफप्रमाणे दिसतात. या फुलांना गंधही असतो. काही दिवसांनी हिरवट रंगाची कंदिलाच्या आकारासारखी फळं येतात.

ही फळं पाण्यावर तरंगणारी असल्याने या झाडाचा बीजप्रसार होतो. मध्यम उंची असल्याने ही झाडं बगिच्यांमधील रस्त्यांसाठी उपयुक्त असतात. या झाडाच्या पानांचा, सालीचा आणि बियांचा उपयोग करून माशांसाठी विष बनवता येतं. तसंच, या झाडाच्या बियांचा उपयोग पोटातील जंतांवर देखील करता येतो.