करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची लगबग

शारदीय नवरात्रोत्सवास 3 ऑक्टोबरला घटस्थापनेपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातही स्वच्छतेला वेग आला आहे. आज परंपरेनुसार मूळ मूर्तीला विधिवत इरलं पांघरून गर्भगृहाची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीत मूळ मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते.

मंदिरातील महासरस्वती मंदिराजवळ श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. दिवसभरात देवीच्या सोन्या-चांदीच्या अलंकारांसह साहित्याची स्वच्छता करण्यात आली. गरुड मंडपाची प्रतिकृतीही उभारण्यात येत आहे. सायंकाळी आरती आणि सालंकृत पूजा झाल्यानंतर मूळ उत्सवमूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली.