साय-फाय – अॅपल हिंदुस्थान सरकारच्या निशाण्यावर

>> प्रसाद ताम्हणकर

हिंदुस्थान सरकारच्या बेकायदेशीर दबावाविरुद्ध फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी आधीच टाहो फोडलेला असताना आता अॅपलसारख्या जगप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनीलादेखील हिंदुस्थान सरकारच्या दबावाचा मोठय़ा प्रमाणावर सामना करावा लागल्याचा खुलासा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकन वृत्तपत्राने केल्याने एकच खळबळ माजलेली आहे. काही महिन्यांपूर्वी अॅपलकडून काही महत्त्वाच्या हिंदुस्थानी व्यक्तींना जो धोक्याचा संदेश पाठवण्यात आला होता त्यावरून हे सगळे रामायण घडल्याचे समोर येत आहे.

2023 च्या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (तत्कालीन?) खासदार महुआ मोईत्रा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा दावा केला की, त्यांना अॅपल कंपनीकडून नुकताच एक सावध करणारा संदेश मिळाला आहे. या संदेशामध्ये स्टेट स्पॉन्सर हल्लेखोरांनी त्यांचा मोबाइल हॅक करण्याचा प्रयत्न केला होता असा इशारा दिला होता. मोईत्रा यांच्या या मेसेजची चर्चा होत असतानाच शशी थरूर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काही विरोधी पक्षांचे खासदार आणि काही पत्रकारांनीदेखील अॅपलकडून असाच संदेश प्राप्त झाल्याचा दावा केला आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले. यातील काही लोकांनी पुरावा म्हणून आलेल्या संदेशाचा पीन शॉटदेखील शेअर केला.

या प्रकरणाचे पडसाद उमटू लागल्यावर अनेक भाजप नेत्यांनी अॅपलच्या या संदेशावर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. धोक्याचा इशारा देणाऱया अॅपलच्या या अल्गोरिदममध्ये काही बिघाड झाल्याने चुकून हा संदेश काही लोकांना पाठवण्यात आल्याचा दावादेखील काही नेत्यांनी आणि समर्थकांनी केला. सरकारनेदेखील हॅकिंगचे हे आरोप ठामपणे फेटाळून लावले आणि या संदेश प्रकरणाची मुळापर्यंत जाऊन तपासणी केली जाईल आणि सत्य उघडकीला आणले जाईल असे आश्वासन दिले. आता सरकारने तपासणी केली म्हणजे नक्की काय केले हे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने 28 डिसेंबरच्या आपल्या अहवालात उघड केले आहे. हा अहवाल वॉशिंग्टन पोस्ट आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल सिक्युरिटी लॅबने संयुक्तपणे तयार केला आहे.

या अहवालानुसार सावध करणारा हा संदेश प्राप्त झाल्याची घटना घडल्याच्या लगेच दुसऱया दिवशी मोदी सरकारच्या अधिकाऱयांनी अॅपलच्या अधिकाऱयांवर दबाव आणायला सुरुवात केली आणि हा पाठवला गेलेला संदेश म्हणजे अॅपलच्या सिस्टीममधली चूक होती असे जाहीर करण्यास सांगितले. या अहवालामध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, सरकारी अधिकाऱयांनी अॅपलच्या हिंदुस्थानातील प्रतिनिधीला फोन केला आणि या संदेश प्रकरणामुळे जे काही राजकीय वातावरण तापले आहे, ते शांत करण्यासाठी हिंदुस्थान सरकारला मदत करा, असे सांगितले. एवढय़ावर न थांबता हिंदुस्थान सरकारने अॅपलच्या एका परदेशी सुरक्षा तज्ञाला देशात बोलावले आणि घडलेल्या घटनेबद्दल अॅपलचे स्पष्टीकरण तयार करण्यास सांगितले.

या संदेश प्रकरणानंतर सरकारी अधिकारी अत्यंत संतापलेले होते असा दावा अॅपलच्या एका अधिकाऱयाने नाव न सांगण्याचा अटीवर ‘वॉशिंग्टन पोस्ट’शी बोलताना केला आहे. या प्रकरणात अॅपलचे सर्व परदेशी अधिकारी आपल्या हिंदुस्थानातील अधिकाऱयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. मात्र घडल्या प्रकारात अॅपलचीच कशी चूक आहे हे दाखवण्याचा, अॅपलची जनमानसात असलेली विश्वासार्हता कमी करण्याचा, कंपनीवर दबाव आणण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा परिणाम साहजिक अॅपलच्या मुख्य कार्यालयात बसणाऱया अधिकाऱयांवर झाला.

या अहवालात हिंदुस्थान ही येणाऱया शतकात अॅपलसाठी प्रचंड मोठी बाजारपेठ ठरणार असली तरीदेखील जगातील सर्वात मोठय़ा टेक कंपनीला हिंदुस्थान सरकारच्या दबावाला सामोरे जावे लागले याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हिंदुस्थान सरकारने मात्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या या वृत्ताचे जोरदार खंडन केले आहे आणि ही अर्धवट सत्य सांगणारी बातमी आहे असा दावा केला आहे. जो संदेश पाठवला गेला, तो का गेला? याचा खुलासा अॅपलनेच करायचा आहे. हिंदुस्थान सरकारने या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे आणि अॅपलला या तपासात सामील होण्याची आणि सहयोग करण्याची विनंती करण्यात आलेली आहे असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

[email protected]