प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र, माजी खासदार पूनम महाजन यांचा गौप्यस्फोट

प्रमोद महाजन यांची हत्या क्षुल्लक कारणावरून झालेली नाही असे विधान महाजन यांच्या कन्या आणि भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी केले आहे. तसेच महाजन यांच्या हत्येची नव्याने चौकशी करावी अशी मागणीही करणार असल्याचे पूनम महाजन म्हणाल्या.

मुंबई तक या वाहिनीला मुलाखत देताना पूनम महाजन म्हणाल्या की, प्रमोद महाजन यांची हत्या राजकीय कारणाने झाली नाही. ज्या बंदुकीने महाजन यांच्यावर गोळी झाडण्यात आली, त्या बंदुकीचे आणि गोळीचे पैसैही प्रमोद महाजन यांचेच होते. एका व्यक्तीने महाजन यांच्यावर गोळी झाडली गेली, पण त्या मागे मेंदू आणखी कुणाचा तरी होता. ज्या कारणामुळे महाजन यांची हत्या झाली ते कारण राजकीय नव्हते आणि क्षुल्लकही नव्हते असेही महाजन म्हणाल्या.

2007-08 साली याबाबत मी बोलत होते, पण मला गांभीर्याने घेतले नाही असे पूनम महाजन म्हणाल्या. आता प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबत नव्याने चौकशी व्हावी अशी मागणी मी करणार आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना आपण पत्र लिहिणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.