45 वा ‘प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव’ उद्यापासून

प्रबोधन गोरेगावचे संस्थापक, माजी मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पश्चिम उपनगरात लोकप्रिय असलेला ‘’प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे’ 11 ते 14 डिसेंबरदरम्यान प्रबोधन क्रीडाभवन येथे आयोजन केले जाणार आहे. यंदा या महोत्सवाचे 45 वे वर्ष आहे. या वर्षी 300 पेक्षा जास्त शाळा आणि 4 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आपले क्रीडा नैपुण्य विविध खेळांच्या माध्यमातून दाखवतील.

या महोत्सवात पश्चिम उपनगरातील वांद्रे ते दहिसरपर्यंतच्या शाळा मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या महोत्सवात चमकलेल्या खेळाडूंनी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरही आपली छाप सोडलेली आहे. महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण होत आली आहे, असे प्रबोधन क्रीडा महोत्सवाचे समन्वयक शशांक कामत यांनी सांगितले. प्रत्येक खेळात सर्वाधिक गुण कमाई करणाऱ्या शाळांना सांघिक पुरस्कार दिले जातात. एकत्रितरीत्या अव्वल ठरणाऱ्या शाळेला ‘प्रबोधन ग्रॅण्ड ट्रॉफी’चा बहुमान प्राप्त होतो. तिरंदाजी, ऍथलेटिक्स, जलतरण, बुद्धिबळ, कराटे, स्किमिंग, टेनिस तसेच अस्सल मातीतील खेळ कबड्डी, खो-खो, मल्लखांब असे क्रीडा प्रकार स्पर्धा घेण्यात येतात. सुप्रिया लाइफसायन्स व सावंत प्रोसेस सोल्युशन्स हे या महोत्सवाचे प्रायोजक आहेत.