पोलीस डायरी – अक्षय शिंदेला मारले; ‘त्या’ पुजाऱ्यांचे काय ?

>> प्रभाकर पवार

सोमवार दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी बदलापूर शाळेतील दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय रामचंद्र शिंदे (वय वर्षे – 57) यांनी मुंब्रा येथे पोलीस व्हॅनमध्ये चकमकीत गोळ्या घालून ठार मारले, परंतु या चकमकीमुळे वादंग निर्माण झाले आहे. शाळेच्या फरार व्यवस्थापकांना वाचविण्यासाठी, त्यांच्याविरुद्धचे पुरावे नष्ट करण्यासाठी सरकारने ही खोटी चकमक घडवून आणली असा आरोप विरोधकांनी केला आहे.

अक्षय शिंदे (24) मृत झाल्यानंतर संजय शिंदे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात अक्षय शिंदे याने आम्हा पोलिसांवर हल्ला केला, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद नोंदविली आहे. त्या ‘एफआयआर’चा तपशील खालीलप्रमाणे. संजय शिंदे आपल्या तक्रारीत पुढे म्हणतात, 23 सप्टेंबर रोजी सायं. 5.30 वा. तळोजा कारागृहातून मी अक्षय शिंदे या आरोपीचा चौकशीसाठी ताबा घेतला. त्यास पोलीस व्हॅनमध्ये बसविले व आम्ही ठाणे शहराच्या दिशेने निघालो. मी व्हॅनचालकाच्या बाजूला बसलो होतो. एपीआय नीलेश मोरे व दोन अंमलदार हे आरोपी अक्षय शिंदेच्या सोबत व्हॅनच्या मागील बाजूस बसले होते. व्हॅन शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ येताच एपीआय नीलेश मोरे यांनी मला मोबाईलवर संपर्क साधला. मोरे म्हणाले, “अक्षय शिंदे हा हिंसक झाला आहे, शिवीगाळ करीत आहे. मला कुठे घेऊन जात आहात? अशी विचारणा करीत आहे।” त्याबरोबर मी व्हॅन थांबविली व व्हॅनच्या पाठच्या बाजूस गेलो. आरोपीला शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याच वेळी अक्षय शिंदेने एपीआय नीलेश मोरे यांच्या कमरेला खोचलेले पिस्तुल खेचण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मोरे यांनी त्याला विरोध केला. त्या वेळी झालेल्या झटापटीमध्ये पिस्तुलातील एक गोळी बाहेर सुटली व नीलेश मोरे यांच्या डाव्या मांडीत घुसली. ते जखमी झाले. मोरे जखमी झाल्यावर अक्षय शिंदेने मोरेंच्या पिस्तुलाचा ताबा घेतला आणि आमच्यावर 2 राऊंड फायर केले. परंतु सुदैवाने मी, दोन अंमलदार व एपीआय मोरे वाचलो. त्या वेळी मी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांचे वरील कथानक ऐकून न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण या खंडपीठाने शंका व्यक्त केली आहे. हे खरे एन्काऊंटर असूच शकत नाही. आरोपीने पिस्तूल हिसकावले, लोड केले यावर विश्वासच बसत नाही. चार प्रशिक्षित पोलिसांना एका आरोपीवर नियंत्रण मिळवता येत नाही हे कसे काय शक्य आहे? असाही सवाल या खंडपीठाने करून चकमकीचा तपास ‘सीआयडी’कडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अक्षय शिंदेंच्या (सरकारमान्य) चकमकीमध्ये लखन भैया चकमकीप्रमाणे ठाण्याच्या पोलिसांचेही बळी जाणार असे दिसून येत आहे.

छोटा राजन टोळीतील रामनारायण गुप्ता ऊर्फ लखन भैया (33) या गुंडाला 11 नोव्हेंबर 2006 रोजी अंधेरी (पश्चिम) वर्सोवा येथे प्रदीप शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी चकमकीत ठार मारले. तेव्हा लखन भैयाचा वकील असलेल्या भावाने ही चकमक खोटी असल्याचा आरोप करून न्यायालयात धाव घेतली त्या वेळी सत्र न्यायालयाने प्रदीप शर्मा वगळता (6 खासगी व्यक्तींसह) 21 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यातील एक पोलीस अधिकारी धसका घेऊन रुग्णालयात मरण पावला. बाकीचे अजूनही जेलमध्ये सजा भोगत आहेत. ज्यांचा चकमकीशी काहीही संबंध नाही असे पोलीस या चकमक प्रकरणात सापडले आणि आयुष्यातून उठले. ज्या प्रदीप शर्माना सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले होते त्या प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी अलीकडे दोषी ठरवून त्यांना (18 वर्षांनंतर) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. परंतु शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात या आदेशावर स्थगिती आणली आहे.

अक्षय शिंदेला ठार मारून शाळेच्या व्यवस्थापकांना शिंदे, फडणवीस सरकारने वाचविले आहे. बदलापूर शाळेचे विश्वस्त मानवी तस्करी व पोर्नोग्राफीत सहभागी असल्याचाही आता आरोप करण्यात येत असून केतन तिरोडकर यांनी न्यायालयात शाळेच्या ट्रस्टीविरोधात एक जनहित याचिका दाखल केली आहे.

महिलांवर अत्याचार करणाऱ्या, त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना ठेचले पाहिजे, फासावर चढविले पाहिजे. अक्षय शिंदेला जसे मारले तसे लपून छपून मारायची गरजच नाही. त्याला अगदी खुलेआममारायला हवे होते. लोकांना ते आवडले असते. नगरमधील संगमनेरमध्ये व. शि. दुमणे या डॅशिंग फौजदाराने किसन सावजी या गावगुंडाला आम पब्लिकसमोर ठोकले होते. गावातील जी बाई आवडेल तिला तो उचलायचा व नासवायचा दुमणे यांनी 29 जानेवारी 1966 रोजी सावजीला शेकडो लोकांसमोर गोळी घालून ठार मारले व जनतेची वाहव्वा मिळविली. शिंदे-फडणवीस सरकारलाही हे करता आले असते. शाळेच्या व्यवस्थापकांना अटक करून अक्षय शिंदेचा समाचार घेता आला असता किंवा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून अक्षय शिंदेला महिना दोन महिन्यांत फाशी देता आली असती, परंतु विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्याने महायुती सरकारला मतांची घाई झाली. लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी अक्षय शिंदेचा निवडणुकीपूर्वी पहिला बळी घेतला. तो त्यांच्या अंगाशी आला. न्यायालयाने ‘चकमक ‘फेम अधिकाऱ्यांची ‘पिसे’ काढली. महायुती सरकारवर हा डाव बूमरंगप्रमाणे उलटला. न्यायालयाने पोलिसांनाच न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यामुळे अक्षय शिंदेला चकमकीत मारणाऱ्या पोलिसांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फायदा व्हावा यासाठी अक्षय शिंदेचे एन्काऊंटर केले गेले. मग ठाण्याच्या शिळफाटा परिसरातील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करणाऱ्या शर्मा, मिश्रा व पांडे या तीन पुजाऱ्यांचे काय? सध्या जेलमध्ये असलेल्या या पुजाऱ्यांचा ठाणे पोलीस कधी ताबा घेणार? त्या मराठी महिलेला कधी न्याय देणार? आपल्या देशात आज मिनिटागणिक महिलांवर, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. स्त्रियांकडे एक भोगवस्तू म्हणून पाहिले जात आहे. अक्षय शिंदे व शर्मा, वर्मा (पुजारी) सारखे विकृत नराधम कुठे नाहीत असे क्षेत्र तुम्हाला सापडणार नाही. आपली कारागृहे आता तर बलात्कारी, नराधमांनी रोज भरली जात आहेत. मग या शेकडो नराधमांचा महाराष्ट्र शासन अक्षय शिंदेप्रमाणे काटा का काढत नाही? जर्मनीचा हुकूमशहा हिटलरची कार्यपद्धती का अवलंबली जात नाही? बलात्कारी नराधमांना रोज फुकट पोसण्यापेक्षा त्यांचा अक्षय शिंदेप्रमाणे सोक्षमोक्ष लावला तर त्यात सरकारचाच फायदा आहे. नाही तरी आपल्या देशात लोकशाही आहे कुठे?

[email protected]