ठसा – पांडुरंग सकपाळ

>> प्रभाकर पवार

पांडुरंग सकपाळ ऊर्फ पांडू ऊर्फ भाऊ. त्याचे समकालीन मित्र त्याला प्रेमाने पांडूच बोलायचे. परंतु हा सर्वांचा लाडका पांडू आता या जगात राहिला नाही. 25 मे 2024 रोजी वयाच्या 62व्या वर्षी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना, शिवसैनिकांना हा मोठा धक्का होता. पांडुरंग सकपाळ हे दक्षिण मुंबईतील अत्यंत कट्टर शिवसैनिक, विभागप्रमुख होते. कोणताही गर्व नसलेल्या पांडुरंग सकपाळ यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती; परंतु नरेंद्र मोदी लाटेत भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली. तरीही या खिलाडू वृत्तीच्या शिवसैनिकाने आपले कार्य सुरूच ठेवले होते. अत्यंत सेवाभावी परोपकारी वृत्तीचा हा हाडाचा शिवसैनिक शिवसेनेच्या चिराबाजार येथील शाखेत रोज लोकांच्या समस्या, तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करायचा. अशा शिवसैनिकाचा काळ लवकर येईल, मृत्यू त्यांच्यावर झेप घालेल असे कुणाला वाटले नव्हते.

पांडुरंग सकपाळ हा एक सच्चा कार्यकर्ता होता. त्यांना लिखाणाचीही आवड होती. ‘पंचनामा’ या नियतकालिकाचे ते संपादक होते. अशा या सुशिक्षित पदवीधर शिवसैनिकाला गिरगावात प्रचंड मानसन्मान होता. कोणत्याही कामाला ते नाही बोलायचे नाहीत. कुणाच्याही हाकेला ते धावून जायचे. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी हिरीरीने भाग घेतला होता. त्या अनुषंगाने त्यांच्यावर अनेक केसेस दाखल झाल्या होत्या. तरीही त्यांचे पोलिसांशी सलोख्याचे संबंध होते. पोलिसांनी त्यांच्याशी त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे कधी गैरवर्तन केले नव्हते.

पांडुरंग सकपाळ हे 24 तास लोकसेवेत रमलेले असायचे. गिरगाव शाखेत रात्री उशिरापर्यंत थांबायचे. रात्रीचे जेवणही शाखेत मागवायचे. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर ‘अँजिओप्लास्टी’ करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची तब्येत सुधारली. परंतु अलीकडे त्यांची तब्येत पुन्हा खालावली. तब्येतीच्या कुरबुरी सुरू झाल्या. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा त्यांनी प्रचारही जोरात केला. 20 मे रोजी पांडुरंग सकपाळ यांनी मतदान केले. त्यानंतर सकपाळ यांची तब्येत ढासळली. रात्री उशिरा त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना ‘व्हेंटिलेटर’ लावण्यात आले. तरीही श्वासोच्छ्वासात काहीच प्रगती झाली नाही. व्हेंटिलेटर काढल्यावर प्राणवायूची मात्रा कमी होत होती. 5 दिवस पांडुरंग सकपाळ यांनी मृत्यूशी संघर्ष केला. मात्र अखेर मृत्यूने त्यांना गाठले. मृत्यूवर विजय मिळविणे म्हणजे काळावर विजय मिळविणे आणि ते माणसाच्या आवाक्याबाहेरचे सत्य आहे. मृत्यू हे अटळ सत्य आहे, हे खरे आहे, परंतु पांडुरंग सकपाळसारख्या सच्चा प्रामाणिक कार्यकर्त्याची आज शिवसेनेला खरी गरज होती. तत्त्वशील, निष्ठावान पांडुरंग सकपाळ यांनी अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जोरदार काम केले होते. असा हा दक्षिण मुंबईतील निःस्वार्थी कार्यकर्ता अकाली गेल्याने शिवसैनिक आणि त्यांच्या चाहत्यांना हळहळ वाटणे स्वाभाविक आहे. मात्र त्यांच्यातील निष्ठावान शिवसैनिक सगळय़ांना कायम स्मरणात राहील. त्यांचे प्रथमेश आणि प्रणव हे दोन विवाहित मुलगे युवासेनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेतील असे वाटते.