पोर्श अपघात प्रकरण – ससून रुग्णालयाच्या रक्तचाचणी विभागातील एक कर्मचारी बेपत्ता

पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श अपघात प्रकरणात आता दिवसागणिक नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आधी फक्त दारू पिऊन दोन जिवांच्या मृत्युला कारणीभूत असल्याचं हे प्रकरण आता गंभीर होताना दिसत आहे. कारण, या प्रकरणाच्या निमित्ताने शासन यंत्रणेतील कारभार चव्हाट्यावर आला आहे. पोलीस दल, आरोग्य विभाग, उत्पादन शुल्क विभाग या सगळ्याची पोलखोल या प्रकरणाच्या निमित्ताने होताना दिसत आहे.

या अपघातानंतर वेदांत अगरवाल याच्या रक्ततपासणीवरून सध्या वादंग उठलं आहे. आधीच ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्यामुळे चर्चेत आलेलं ससून आता चांगलंच संशयाच्या भोवऱ्यात आलं आहे. कारण या ससून मधील दोन डॉक्टरांनी वेदांत याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याची माहिती उघड झाली होती. त्यानंतर आता रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. हा कर्मचारी नेमका कोण आहे आणि या सगळ्या प्रकरणात त्याचा कितपत सहभाग होता, हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.

कर्मचाऱ्याचा फोन नॉट रिचेबल येत असल्याने तसंच तो कामावरही गैरहजर असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. पुणे अपघातानंतर झालेल्या घडामोडी समजून घेण्यासाठी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ससूनमधील कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येईल, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.