Nagar News : पूजा खेडकर प्रकरणाचे नगर कनेक्शन समोर, जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळवली प्रमाणपत्रं

पुण्यासह राज्यात सध्या चर्चेत असलेली ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर हिला नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती मिळते. यामुळे नगर शासकीय रुग्णालयातील शल्यचिकित्सक आता चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे समजते.

पूजा खेडकरला 2021 मध्ये तत्कालीन वैद्यकीय मंडळाने डोळे आणि मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र दिल्याचे समजते. शासकीय रुग्णालयाचे दस्ताऐवज तपासले असता, त्यात या नोंदी आढळल्या असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले.

पूजा खेडकरचे वडील सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर हे भालगाव (ता. पाथर्डी) येथील रहिवासी आहेत. परंतु, गेल्या काही वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी पूजा खेडकर ही दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाली आहे. प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तिची पुण्यात नियुक्ती झाली होती. खासगी वाहनावर लाल दिवा लावणे, भारत सरकार असा बोर्ड लावणे, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात हस्तक्षेप करणे, असे नियमबाह्य वर्तन केल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.