यूपीएससीच्या निर्णयाविरुद्ध पूजा खेडकरची न्यायालयात धाव, उमेदवारी रद्द केल्याची प्रत मिळालेली नसल्याचा दावा

वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय यूपीएससीने घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उमेदवारी रद्द केल्याच्या आदेशाची प्रत आपल्याला यूपीएससीकडून अद्याप मिळालेली नसल्याचा दावा खेडकर हिने केला आहे. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावतानाच कॅटमध्ये आव्हान देण्यास मुभा असल्याचे स्पष्ट केले.

यूपीएससीने 31 जुलै रोजी एक प्रसिद्धीपत्रक काढून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केल्याची घोषणा केली होती. तसेच यापुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेस बंदी घातली आहे. या निर्णयास पूजा खेडकर हिने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणावर आज दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पूजा खेडकरच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या वकील इंदिरा जयसिंग यांनी यूपीएससीकडून उमेदवारी रद्द केल्याचा आदेश खेडकरला अद्याप प्राप्त झाला नसल्याचा दावा केला.

पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केल्याचे प्रसिद्धीपत्रक मात्र माध्यमांना उपलब्ध करून देण्यात आले. हे प्रसिद्धीपत्रक रद्द करून आदेशाची प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी वकील इंदिरा जयसिंग यांनी केली. त्यावर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी आदेशाची प्रत न देण्याचे कारण विचारले. यूपीएससीच्या वतीने वकील नरेश काwशिक यांनी पूजा खेडकरचा अधिकृत पत्ता माहीत नसल्याचे सांगितले. यानंतर न्यायालयाने पूजाचा पत्ता यूपीएससीला सांगावा आणि त्यानंतर यूपीएससीने आदेशाची प्रत तिच्या घरी पाठवावी तसेच ई-मेलही पाठवावा, अशा सूचना दिल्या.

कॅटमध्ये अपील करण्याचा अधिकार

पत्ता दिल्यानंतर दोन दिवसांत उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाची प्रत पूजा खेडकरला देण्यात येईल, असे यूपीएससीने न्यायालयात सांगितले. यानंतर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी खेडकरची याचिका फेटाळून लावत यूपीएससीच्या निर्णयाविरुद्ध योग्य पह्रममध्ये (कॅट) अपील करण्याचा अधिकार याचिकाकर्त्यांना असल्याचे स्पष्ट केले.