रेसकोर्सवर अंडरग्राऊंड कार पार्किंग कॉण्ट्रॅक्टर मित्रासाठी बनवणार का? आदित्य ठाकरे यांचा थेट सवाल

राज्याच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कॉण्ट्रक्टर मित्राच्या फायद्यासाठी रेसकोर्सवर बांधकाम करण्याचा डाव मिंधे सरकारने पालिकेच्या माध्यमातून आखला आहे. या ठिकाणी ना लोकवस्ती आहे, ना कमर्शिअल जागा. मग रेसकोर्सवर अंडरग्राऊंड कार पार्किंग घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कॉण्ट्रक्टर मित्रासाठी बनवणार का? असा थेट सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज उपस्थित केला आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सची तब्बल 226 एकर जागा बिल्डर मित्राला जादा ‘एफएसआय’ देऊन घशात घालण्याचा डाव घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून सुरू असल्याचे जाहीर करीत आदित्य ठाकरे यांनी नुकताच हा घोटाळा उघड केला आहे. मुंबईकरांना विश्वासात न घेता पालिका आयुक्तांना हाताशी धरून आणि रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या (आरडब्ल्यूआयटीसी) काही सदस्यांना धमकावून, दबाव आणून महालक्ष्मी रेसकोर्स येथील मुंबईकरांच्या हक्काची शेकडो एकर मोकळी जागा ‘बिल्डर-कंत्राटदार सरकार’च्या घशात घालण्यासाठी हा घोटाळा सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. आता या ठिकाणी भूमिगत पार्किंग बनवण्याचा कुणासाठी बनवता, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, रेसकोर्स प्रशासनाकडे थकीत असलेली देणी घ्यावीत, कार्यक्रमांच्या शुल्कामधील 50 टक्के रक्कम पालिकेला द्यावी, कुठलेही बांधकाम या ठिकाणी करू नये, मुंबईकरांकडून कोणतेही शुल्क घेऊ नका, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आरडब्ल्यूआयटीसीच्या आज झालेल्या बैठकीत रेसकोर्सवर नव्या बांधकामाला सदस्यांनी विरोध केला आहे. पालिका आयुक्त चहल यांनी उपस्थित सदस्यांना याबाबत सादरीकरण केले होते.

या प्रश्नांची उत्तरे द्या-
1. रेसकोर्स हे एक ऑलरेडी पब्लिक पार्क असताना नव्याने पब्लिक पार्कच्या नावाखाली हजारो झाडे तोडणार का?

2. मुंबईकरांच्या घामाच्या पैशातून रेसकोर्स येथे घोडय़ांचा तबेला बांधण्यासाठी 100 कोटी कसे देऊ शकता?

3. पालिकेकडून परिसरातील बिल्डरांना पुन्हा एकदा ‘फ्री एफएसआय’ देण्याचा हा डाव आहे का?

4. लीज संपली असेल तर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडे पालिका आणि राज्य सरकारच्या थकीत असलेल्या रकमेचे काय?

5. लीज संपल्यानंतर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला कार्यक्रमांच्या भाडय़ातून उत्पन्न मिळाले असेल त्यांचे काय?