विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना अडवण्यासाठी शंभू सीमेवर पुन्हा एकदा चकमक झाली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला, तसेच अश्रुधुराचे गोळे झाडले. यात 17 शेतकरी जखमी झाले. जखमी शेतकऱ्यांनी सहकाऱ्यांनी स्ट्रेचरवरून उचलून नेले. यानंतर शेतकऱ्यांनी तूर्तास दिल्ली मोर्चा स्थगित केला आहे.
दरम्यान, अंबालामधील काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश हरियाणा सरकारने दिले आहेत. अंबालात शनिवारपासून 17 डिसेंबर मध्यरात्री 12 पर्यंत इंटरनेट बंद राहणार आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुमिता मिश्रा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
शंभू सीमेवरून दिल्लीकडे शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा पुन्हा सुरू होण्याच्या काही तास आधीच हरियाणा सरकारने ‘सार्वजनिक शांतता’ राखण्यासाठी अंबाला जिल्ह्यातील 12 गावांमध्ये मोबाईल इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे.
बजरंग पुनिया यांचे शेतकऱ्यांचे समर्थन
कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी शेतकऱ्यांना आपले समर्थन दिले आहे. बजरंग पुनिया यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर बोलताना ‘देशात वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा होऊ शकते, तर ‘वन नेशन, वन एमएसपी’चीही अंमलबजावणी व्हायला हवी, असे म्हटले आहे.
मी यापूर्वीही शेतकऱ्यांसोबत होतो, आजही आहे आणि भविष्यातही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे, असे बजरंग पुनिया पुढे म्हणाले. तसेच सर्व शेतकरी संघटनांनी संघटित होऊन चळवळ मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. शेतकरी नेत्यांशी चर्चा करून सर्व संघटनांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पुनिया यांनी सांगितले.