गुन्ह्यांचे स्वरूप कमी केल्याची शिक्षा; नगरच्या 58 अधिकारी, पोलिसांना दंडाचा दणका

एखादा तक्रारदार पोलीस ठाण्यात आला तर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे सांगून त्याची बोळवण करणे वा कुऱ्हाड, रॉड, फावडे, चाकू, तलवारीने झालेल्या हल्ल्याची साधी एनसी (अदखलपात्र) दाखल करून गुह्याचे स्वरूप कमी करण्यासारखे उद्योग करणाऱ्या नगर जिल्ह्यातील 58 पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दणका दिला आहे. यापैकी कोणाला सक्त ताकीद दिली, कोणाला दंड केला, काहींची वेतनवाढ रोखली व काहींना तर थेट मूळ वेतनावरच आणले आहे. यामुळे जिल्ह्याच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

नगर जिल्ह्यात मागच्या वर्षभरात तब्बल 1243 गुन्हे उशिराने दाखल झाले, तर 181 गुह्यांचे स्वरूप कमी केले गेले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मागील वर्षी पदभार घेतल्यानंतर उशिरा गुन्हे दाखल होण्याच्या कारणांचा शोध घेतला. यापैकी काही प्रकरणांत तक्रारदारच तडजोडीच्या उद्देशाने गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. ज्याच्याविरुद्ध तक्रार केली, त्याची तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी वारंवार फक्त चौकशी करून त्याला त्रास दिला जावा, असा छुपा हेतूही यामागे होता. तर, दुसरीकडे दाखल गुह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसले तर वरिष्ठ फैलावर घेतील, कामकाज खराब सुरू आहे, असे म्हणतील तसेच तपासाचा ताणही वाढेल, अशी पोलिसांची मानसिकता होती. त्यामुळे अनेक गुन्हे दाखल करून घेतले जात नव्हते. मात्र, गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याने चुकीच्या तक्रारींचे प्रमाणही कमी झाल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. गुन्हे वाढले म्हणून खराब काम सुरू असल्याचे समजले जात नाही. मात्र, केवळ मालमत्तेबाबतचे गुन्हे, दरोडे, चोऱया वाढल्या तर त्याचे उत्तर द्यावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ताकीद, दंड, वेतनवाढ रोखण्यासह मूळ वेतनावर आणण्याची शिक्षा

जिल्ह्यात मागच्या वर्षी 1243 गुन्हे उशिराने दाखल झाले. यात नगर शहरात 151, नगर ग्रामीणमध्ये 217, कर्जतला 162, शेवगावला 256, श्रीरामपूरला 158, शिर्डीला 134 व संगमनेरला 165 गुन्हे आहेत. तसेच, 181 प्रकरणांमध्ये गुन्ह्याचे स्वरूप कमी केले गेले होते. यात जामखेड पोलीस ठाण्यात 11, एमआयडीसी पोलीस ठाण्यात 10, बेलवंडीला 30, कोपरगावला 9, लोणीला 6, नेवाशाला 9,पाथर्डीला 6, राजूरला 5, तोफखान्याला 4, कर्जतला 11, पारनेरला 11, घारगावला 12, अकोल्यात 1, भिंगार कॅम्पला 16, श्रीगोंदा 27, शेवगाव 5, संगमनेर 5 व नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील 3 प्रकरणांचा समावेश होता. गुह्याचे स्वरूप कमी करून अदखलपात्र गुन्हे दाखल केले गेले होते. त्यामुळे यातील सर्व 58 दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी 29 जणांना सक्त ताकीद दिली आहे. 13 जणांना दंड केला आहे. 11 जणांची वेतनवाढ रोखली, तर पाचजणांना मूळ वेतनावर आणले आहे.

व्हिडीओद्वारे जागृती नियोजन

ऑनलाइन फसवणुकीसह अन्य वाढते सायबर गुन्हे, सोने वा पैशांचे आमिष दाखवून फसवणूक, वाढत्या दुचाकी चोऱया या तीन विषयांबाबत नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षतेच्या अनुषंगाने छोटे व्हिडीओ पोलीस करणार असून, ते सोशल मीडियाद्वारे जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचेही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

महिला-मुलींच्या तक्रारी वाढल्या

मागील वर्षभरात महिला व मुलींकडून तक्रारी वाढल्याने 363 गुन्हे वाढ झाले आहेत. यात विनयभंगाचे 121, बलात्काराचे 25, पळवून नेण्याचे 77 व दुखापतीसह अन्य गुन्ह्यांचा समावेश आहे. पूर्वी बदनामीच्या भीतीने घरातील नातेवाईक, शिक्षक, पोलीस यांच्याकडून विरोध झाल्याने महिला व मुली तक्रार देत नव्हत्या; पण निर्भया प्रकरणानंतर जागृती वाढली असून, झालेल्या अन्यायाची दाद मागण्याची मानसिकता महिला व मुलींची झाली आहे.

दरम्यान, महिला-मुली वा कोणत्याही नागरिकाने तसेच न्यायालयात खटला सुरू असलेल्या साक्षीदाराने कोणापासून वा गुंडांपासून भीती वाटत असेल, कोणाकडून दहशत होत असेल तर ‘विटनेस प्रोटेक्शन ऍक्टनुसार’ त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल. प्रकरणाच्या गांभीर्यानुसार ते मोफत-सशुल्क असेल, असेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले आहे.